महेश बोकडे, लोकसत्ता 

नागपूर : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या नागपुरातील आदिवासी संशोधन केंद्रात २०१८-१९ पासून सर्व अभ्यासक्रम बंद झाले होते; परंतु २०२१-२२ या शैक्षणिक सत्रापासून येथे बी.एस्सी. ऑप्थोलमिक सायन्स आणि बी.एस्सी. ऑप्टोमेट्री हे दोन अभ्यासक्रम सुरू होणार होते. शासनाकडून मंजुरीच मिळाली नसल्याने हे अभ्यासक्रम यंदा सुरू होण्याची शक्यता धूसर झाली आहे.

आदिवासींवरील विविध आजारांवर संशोधनासोबतच विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण देण्यासाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने नागपूर, औरंगाबाद, पुणे, नाशिक, मुंबई, कोल्हापूर असे सहा विभागीय केंद्र सुरू केले.  नागपुरातील मेडिकल रुग्णालय परिसरात २००९ मध्ये हे केंद्र सुरू झाले. येथे २०१७-१८ या शैक्षणिक सत्रापर्यंत डिप्लोमा इन ऑप्थोलमिक सायन्स आणि डिप्लोमा इन ऑप्टोमेट्री हे प्रत्येकी २० विद्यार्थी क्षमतेचे अभ्यासक्रम सुरू होते.  परंतु २०१८-१९ मध्ये हे दोन्ही अभ्यासक्रम औरंगाबादला स्थानांतरित झाले. त्यानंतर येथे अभ्यासक्रम बंद झाले. दरम्यान येथे पुन्हा नवीन दोन अभ्यासक्रम पुन्हा सुरू करण्यासाठी नागपूरच्या आदिवासी केंद्राने महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडून शासनाला तीन वर्षांपूर्वी प्रस्ताव पाठवला होता. गेल्या वर्षी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडून नागपूर आणि औरंगाबाद या दोन केंद्रांत बी.एस्सी. ऑप्थोलमिक सायन्स आणि बी.एस्सी. ऑप्टोमेट्री हे दोन अभ्यासक्रम सुरू करण्याची प्रक्रिया शेवटच्या टप्प्यात होती; परंतु शासनाकडून केंद्रात अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी मंजुरी मिळाली नाही.

नागपूरच्या केंद्रात बी.एस्सी. ऑप्थोलमिक सायन्स आणि बी.एस्सी. ऑप्टोमेट्री हे दोन अभ्यासक्रम या शैक्षणिक सत्रापासून सुरू करण्याचे प्रयत्न होते. काही तांत्रिक कारणाने त्यात अडचणी आल्याने ते पुढच्या शैक्षणिक सत्रापासून सुरू केले जाईल. सध्या येथे ट्रायबल सायन्स विषयात फेलोशिप सुरू असून आरोग्याशी संबंधित कार्यशाळा व प्रशिक्षण घेतले जात आहेत.

– डॉ. मनीषा कोठेकर, प्रभारी विभागीय संचालक, नागपूर