नागपूर: तुटण्याच्या स्थितीत आलेली नाती टिकवण्यासाठी किंवा त्यांना कायदेशीर चौकटीत बसवण्यासाठी न्याय मंदिर हा शेवटचा पर्याय असतो. इथे वाद-प्रतिवादातून तोडगा निघावा अशी अपेक्षा असते. मात्र त्याच न्यायालयाच्या आवारात हतबल पत्नीच्या पदरी मंगळवारी उद्वेग आणि धक्कादायक अनुभव आला.

कामठी येथील प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी न्यायालयाच्या आवारातच, पतीने पत्नीला सलग तीन वेळा “तलाक, तलाक, तलाक” उच्चारून नाते कायमचे संपवले. न्याय मंदिराच्या पायरीवरच हा धक्कादायक प्रसंग घडल्याने परिसरात खळबळ उडाली.

घटनेची पार्श्वभेमी काय….?

कामठीतील २९ वर्षीय तरुणीचा विवाह २०२१ मध्ये मुस्लिम रितीरिवाजानुसार नेहाल अहमद अन्सारी याच्याशी झाला. संसाराची नवी स्वप्ने घेऊन एकत्र आलेल्या या जोडप्यात काही काळातच कौटुंबिक वाद सुरू झाले. प्रकरण इतके विकोपाला गेले की, शेवटी न्यायालयात धाव घ्यावी लागली आणि ती महिला माहेरी आश्रयाला गेली.

नेमकं काय घडलं…?

याच प्रकरणाची सुनावणी मंगळवारी कामठी येथील प्रथम न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात होती. सुनावणी दरम्यान न्यायालयीन कामकाज आटोपल्यानंतर दुपारी एकच्या सुमारास महिला वडिलांसोबत न्यायालयाबाहेर आली. वडील गाडी आणण्यासाठी बाजूला झाले अन्‌ अचानक पती तेथे आला. तिने काही समजण्याच्या आतच पतीने शिवीगाळ केली आणि न्यायालयाच्या आवारातच तीन वेळा “तलाक” उच्चारून तो निघून गेला.

हतबल पत्नीची पोलिसांकडे धाव…

“जिथे न्याय मिळेल अशी आशा होती, त्याच न्यायालयाच्या परिसरात अशा प्रकारे अपमानित केले जाईल असे वाटले नव्हते,” अशा भावना व्यक्त करत या धक्कादायक प्रकारानंतर पीडित महिलेने थेट नवीन कामठी पोलीस ठाणे गाठले.

पोलीस कारवाई आणि कायद्याचा बडगा

महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी पावले उचलली. याप्रकरणी पती नेहाल अन्सारी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटस्फोटाशी निगडीत न्यायालयीन प्रक्रिया सुरु असताना अशा प्रकारे सार्वजनिक ठिकाणी आणि न्यायालयाच्या आवारातच ‘ट्रिपल तलाक’ देण्याच्या घटनेने नागपूर जिल्ह्यात चर्चेला उधाण आले आहे. आता पोलीस तपासात काय समोर येते आणि पीडितेला कसा न्याय मिळतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.