चंद्रपूर : ग्रामीण मातीत रुजलेली स्वप्ने जिद्द, अभ्यास आणि सामाजिक बांधिलकीच्या बळावर जगाच्या व्यासपीठापर्यंत पोहोचू शकतात, याचे प्रेरणादायी उदाहरण चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातील रामपूर गावच्या कन्या प्रा. त्रिवेणी रंजना जनार्धन गव्हाळे यांनी घालून दिले आहे.

मराठी भाषा, साहित्य आणि सामाजिक परिवर्तनाचा ध्यास घेणाऱ्या प्रा. गव्हाळे यांनी रशियातील इरकुत्स्क येथे नुकत्याच पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक आदान-प्रदान परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व करून जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

मराठी भाषेचे वैभव या विषयाची प्रभावी मांडणी

रशियन फेडरेशनच्या फेडरल एजन्सी फॉर सीआयएस अफेअर्स, कॉम्पॅट्रियट्स लिव्हिंग अब्रॉड अँड इंटरनॅशनल ह्युमॅनिटेरियन कोऑपरेशन यांच्या वतीने आयोजित ‘न्यू जनरेशन’ या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय कार्यक्रमासाठी भारतातून प्रा. त्रिवेणी गव्हाळे यांची निवड करण्यात आली होती. जून २०२६ मध्ये आयोजित या परिषदेत जगातील विविध देशांतील निवडक प्रतिनिधींनी सहभाग घेतला होता. या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारताचे प्रतिनिधित्व करताना प्रा. गव्हाळे यांनी भारतीय संस्कृतीची समृद्ध परंपरा, मराठी भाषेचे वैभव, साहित्याची सामाजिक बांधिलकी आणि परिवर्तनवादी विचार यांची प्रभावी मांडणी केली. विविध देशांतील प्रतिनिधींशी संवाद साधताना त्यांनी भारतीय समाजजीवन, ग्रामीण संस्कृती आणि मराठी साहित्याच्या वैशिष्ट्यांची ओळख करून दिली.

प्रा. गव्हाळे यांचा प्रेरणादायी प्रवास

सध्या पुणे येथे वास्तव्यास असलेल्या प्रा. गव्हाळे या मराठी भाषा व साहित्याच्या अभ्यासक, प्राध्यापिका आणि सामाजिक कार्यकर्त्या म्हणून कार्यरत आहेत. शिक्षण, साहित्य, महिला सक्षमीकरण, सामाजिक जनजागृती, ग्रामीण विकास, सांस्कृतिक संवाद आणि सामाजिक परिवर्तन या विषयांवर त्या सातत्याने काम करत आहेत.

मराठी साहित्याबरोबरच महिला अभ्यास आणि मानसशास्त्र या विषयांतील त्यांच्या शैक्षणिक अभ्यासामुळे समाज आणि संस्कृतीकडे पाहण्याची त्यांची दृष्टी अधिक व्यापक झाली आहे. राजुरा तालुक्यातील एका छोट्याशा गावातून शिक्षणाचा प्रवास सुरू करून आंतरराष्ट्रीय परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व करण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहावीत आणि त्यासाठी चिकाटीने प्रयत्न करावेत, असा संदेश त्यांच्या यशातून अधोरेखित झाला आहे.

प्रा. त्रिवेणी गव्हाळे यांच्या या उल्लेखनीय यशामुळे चंद्रपूर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील साहित्य, शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण आहे. विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, आपल्या मातीतून घडलेल्या या कन्येने जागतिक व्यासपीठावर भारताचा आवाज बुलंद केल्याचा अभिमान व्यक्त केला जात आहे.

आयुष्यातील अत्यंत सन्मानाचा क्षण – प्रा. त्रिवेणी गव्हाळे

“रशियातील आंतरराष्ट्रीय परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणे हा माझ्या आयुष्यातील अत्यंत सन्मानाचा क्षण आहे. विविध देशांच्या संस्कृती, साहित्य आणि मानवी मूल्यांचा परस्पर संवाद अधिक दृढ करण्यासाठी मी सातत्याने प्रयत्नशील राहीन. संशोधनाच्या माध्यमातून साहित्य आणि संस्कृतीचा समृद्ध दस्तावेज तयार करून जागतिक स्तरावर भारतीय आणि मराठी संस्कृतीची ओळख अधिक व्यापक करण्याचा माझा मानस आहे,” असे प्रा. त्रिवेणी गव्हाळे यांनी सांगितले.