|| देवेश गोंडाणे

चुका झाल्याचे सिद्ध; आरोग्य विभागाकडून ४८ तासांत उत्तराची मागणी

नागपूर : न्यास कम्युनिकेशन प्रा. लि. (एनसीपीएल) या खासगी कंपनीने सार्वजनिक आरोग्य विभागाच्या २४ ऑक्टोबरला झालेल्या ‘क’ वर्गाच्या लेखी परीक्षेदरम्यान अक्षम्य चुका केल्याचा ठपका आरोग्य सेवा आयुक्तालयाने ठेवला आहे.

परीक्षेत गैरव्यवस्थापन, नियोजनातील त्रुटी, परीक्षा केंद्रांमधील वास्तवाबाबत असलेला निष्काळजीपणा आणि समन्वयाच्या अभावामुळेच परीक्षेत गोंधळ निर्माण झाल्याने कंपनीवर दंडात्मक कारवाई का करू नये, अशी ताकीद देण्यात आली आहे. पुढील दोन दिवसांत यावर उत्तर न आल्यास कंपनीला काळ्या यादीत टाकले जाईल, असे बजावण्यात आले आहे. आरोग्य विभागाच्या पत्रामुळे २४ ऑक्टोबरच्या परीक्षेत चुका झाल्याचे सिद्ध झाल्याने वर्ग ‘क’ची परीक्षा रद्द होणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

आरोग्य सेवा आयुक्तालयाने बजावलेल्या पत्रानुसार, सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वर्ग ‘क’ आणि ‘ड’ वर्गाच्या परीक्षा २४ व २५ सप्टेंबरला घेण्याचे ठरले होते. मात्र, न्यास कम्युनिकेशन प्रा. लि.ने परीक्षा केंद्रांसाठी आवश्यक तेवढ्या शाळा राखीव न केल्याने व उमेदवारांना देण्यात आलेल्या परीक्षा प्रवेशपत्रांमध्ये चुका झाल्याने २४ व २५ सप्टेंबरला परीक्षा घेण्यास ते असमर्थ असल्याचे परीक्षेच्या ११ तासांआधी आरोग्य विभागाला कळवण्यात आले. पुढील परीक्षेसाठी तीन आठवड्यांचा अवधी वाढवून द्यावा, अशी विनंतीही करण्यात आली. नैसर्गिक न्यायाचा विचार करून ‘एनसीपीएल’ची विनंती मान्य करून परीक्षा २४ आणि ३१ ऑक्टोबरला घेण्याचा निर्णय घेण्यात आला. यानंतरही पारदर्शी व सुनियोजित परीक्षा व्हावी म्हणून आरोग्य विभागाने ६ ऑक्टोबरला दूरदृश्यप्रणालीद्वारे ‘एनसीपीएल’सोबत बैठक घेतली. या वेळी ‘एनसीपीएल’ला परीक्षेदरम्यान पोलीस संरक्षण, स्ट्राँग रूम, सेफ रूम, परीक्षा नियंत्रकांना प्रशिक्षण आदी बाबींसाठी मदत करण्याचे आश्वासन देण्यात आले. मात्र, यानंतरही रविवार, २४ ऑक्टोबरच्या लेखी परीक्षेदरम्यान ‘एनसीपीएल’च्या चुकांमुळे गोंधळ उडाल्याचे आरोग्य विभागाने मान्य केले आहे. आरोग्य विभागाचे निरीक्षक आणि प्रसारमाध्यमांमधून आलेल्या वृत्तानुसार परीक्षेमध्ये नियोजनाचा अभाव, परीक्षेच्या तयारीतील उणिवा, परीक्षा केंद्रांवरील व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष, परीक्षा नियंत्रक, पर्यवेक्षक आणि ‘एनसीपीएल’च्या अधिकाऱ्यांमध्ये प्रशिक्षणाचा अभाव असल्याने पारदर्शी परीक्षा घेता आली नाही, असा ठपका आरोग्य विभागाने ठेवला आहे. अशा अक्षम्य चुकांसाठी ‘एनसीपीएल’वर कारवाई का केली जाऊ नये, असा सवाल करीत ४८ तासांच्या आत यावर उत्तर सादर करावे अशी ताकीद देण्यात आली आहे. वेळेपूर्वी ‘एनसीपीएल’चे उत्तर न आल्यास कंपनीला काळ्या यादीत टाकण्याची प्रक्रिया सुरू करू, असेही कळवण्यात आले आहे.

वर्ग ‘क’च्या परीक्षेवर प्रश्नचिन्ह

आरोग्यमंत्र्यांनी पारदर्शी परीक्षेची शेकडो आश्वासने दिली असली तरी ती फोल ठरल्याचे आता उघड झाले आहे. परीक्षेदरम्यान ‘एनसीपीएल’कडून गोंधळ झाल्याचे आता आरोग्य विभागानेही मान्य केले आहे. उमेदवारांना अन्याय झाल्याने ही परीक्षा ग्राह्य धरता येणार नाही. त्यामुळे २४ ऑक्टोबरला झालेली ‘क’ वर्गाची परीक्षा रद्द करून नव्याने एमपीएससीमार्फत परीक्षा घ्यावी, अशी मागणी एमपीएससी समन्वय समितीचे उपाध्यक्ष विश्वंभर भोपळे यांनी केली. तसेच ३१ ऑक्टोबरची परीक्षाही ‘एनसीपीएल’कडून घेणे अयोग्य असल्याची भूमिका मांडली.

काही चुका अशाही…

अनेक केंद्रांवर मोबाइल जॅमर कार्यान्वित नव्हते. ‘एनसीपीएल’चे समन्वयक प्रशिक्षित नव्हते. ते अनेक ठिकाणी उशिरा पोहोचले तर काही केंद्रांवर गैरहजर होते. शिवाय पुणे येथील ७०१२ क्रमांकाच्या परीक्षा केंद्रावर १० नर्सिंग उमेदवारांना लॅब असिस्टंटचा पेपर देण्यात आला. दुपारी ४.१५ वाजता हे ‘एनसीपीएल’च्या लक्षात आणून दिल्यावर उमेदवारांना दोन तासांचा वेळ वाढवून देण्यात आला.

३१ ऑक्टोबरच्या परीक्षेचे काय?

आरोग्य विभागाने ‘एनसीपीएल’ला नोटीस बजावून चुकांसाठी काळ्या यादीत टाकण्याची प्रक्रिया राबवण्याची ताकीद दिली आहे. असे असतानाही ३१ ऑक्टोबरला होणाऱ्या वर्ग ‘ड’च्या विविध पदांच्या परीक्षेसाठी ‘एनसीपीएल’कडूनच उमेदवारांना ओळखपत्राचे ईमेल पाठवले जात आहेत. त्यामुळे परीक्षा नियोजनांमध्ये गोंधळ उडवणाऱ्या अशा कंपनीकडून पुन्हा परीक्षा कशी, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.