वर्धा : ऐन सणासुदीचे दिवस सूरू झाले असतानाच बाजारातील खाद्य पदार्थांना बहार आल्याचे दिसून येते. हे विकतचे पदार्थ खरेदी करण्यावर लोकांचा भर दिसून येतो. पण ते खरंच शुद्ध आहेत कां, हे कोण तपासणार ? तर याचे उत्तर आज महाराष्ट्रातील लहान मुलगा पण देवू शकेल. म्हणजेच अन्न व औषधी प्रशासन आयुक्तपदी तुकाराम मुंडे हे येताच लोकांच्या अपेक्षा अधिकच वाढल्या आणि त्या पुर्ण पण होत असल्याचे म्हटल्या जाते. आता वर्ध्यात आणखी काही कारवाया झाल्यात.
२ दुकानांवर छापे
अन्न सुरक्षा आणि मानके कायदा २००६ अंतर्गत नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या अन्न व्यावसायिक आस्थापनांवर अन्न व औषध प्रशासनाने वर्धा जिल्ह्यात मोठी धडक कारवाई केली आहे. बॅचलर रोड, वर्धा येथील प्रसिद्ध ई-कॉमर्स डिलिव्हरी पेढी ‘ब्लिंक इट’ (मे. ब्लिंक कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेड) आणि देवळी तालुक्यातील मौजा भीडी येथील ‘कांचन फूड्स अँड बेवरेजेस’ या दोन्ही पेढ्यांचे अन्न परवाने २८ ऑगस्ट २०२६ पासून तात्काळ प्रभावाने पुढील आदेशापर्यंत निलंबित करण्यात आले आहेत. ब्लिंक इट – अस्वच्छता आणि नोटीसकडे दुर्लक्ष झाले. अन्न सुरक्षा अधिकारी रविराज धाबर्डे यांनी २० जुलै २०२६ रोजी बॅचलर रोड येथील ‘ब्लिंक इट’च्या गोदामाची पाहणी केली होती. या पाहणीत तीव्र अस्वच्छता आणि अन्न सुरक्षा कायद्याचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आले.
सहाय्यक आयुक्त सरसावले
यानंतर सहाय्यक आयुक्त (अन्न) प्र. भा. टोपले यांनी आस्थापनेला १५ दिवसांची सुधारणा नोटीस बजावली होती.
मात्र दिलेल्या मुदतीत पूर्तता अहवाल सादर न केल्याने १४ ऑगस्ट रोजी तत्कालीन सहाय्यक आयुक्त प्रवीण उमप यांच्यासमक्ष सुनावणी झाली. या सुनावणीत २५ ऑगस्टपर्यंत वेळ मागूनही कंपनीने आवश्यक सुधारणा केली नाही. त्यामुळे व्यापक जनहित व ग्राहकांच्या आरोग्याचा विचार करून प्रशासनाने या पेढीचा अन्न परवाना निलंबित केला.
कांचन फूड्स –
दुसऱ्या एका गंभीर प्रकरणात देवळी तालुक्यातील मौजा भीडी येथील ‘कांचन फूड्स अँड बेवरेजेस’ या बेसन उत्पादक पेढीची २५ ऑगस्ट रोजी अन्न सुरक्षा अधिकारी पीयूष मानवतकर, एल. पी. सोयाम आणि आर. एस. वाकडे यांनी सहाय्यक आयुक्त (दक्षता) वाय. बी. दहातोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासणी केली. तपासणीदरम्यान या ठिकाणी भयानक प्रकार उघडकीस आले:
मुदत संपलेले बेसन
पिवळ्या वाटाण्याच्या डाळीपासून तयार केलेले मिश्रित फ्लोअर ‘बेसन’ या नावाने विकले जात होते. पॅकिंगवर कायद्यानुसार अनिवार्य असलेले लेबल तपशील दिलेले नव्हते. ९.९५ लाख रुपयाचा साठा जप्त झाला. प्रशासनाने या ठिकाणाहून ५९ हजार ८४० रुपये किमतीचे ७४८ किलो बेसन (सर्वोत्तम), ७ लाख ३७ हजार ७६० रुपये किमतीचे ६,१४८ किलो बेसन (ट्रॅक्टर) आणि १ लाख ९७ हजार ९१२ रुपये किमतीची ४,४९८ किलो पिवळ्या वाटाण्याची डाळ असा एकूण ११ हजार ३९४ किलो वजनाचा ९ लाख ९५ हजार ५१२ रुपयांचा साठा जप्त केला आहे. जप्त साठ्याचे नमुने विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठवले असून अहवाल प्राप्त होताच पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल.
कडक इशारा आणि आवाहन
सदर कारवाई अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या आदेशानुसार, नागपूर विभागाचे सह आयुक्त कृष्णा जायपूरकर यांच्या नेतृत्वात आणि सहाय्यक आयुक्त प्र. भा. टोपले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. निलंबन कालावधीत कोणत्याही अन्नपदार्थाचे उत्पादन, विक्री, साठवणूक व वितरण करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. अस्वच्छ ठिकाणी अन्न निर्मिती किंवा भेसळयुक्त खाद्यपदार्थांची विक्री होत असल्यास नागरिकांनी त्वरित अन्न औषध प्रशासनाला कळवावे, असे आवाहन आयुक्त तुकाराम मुंडे यांनी केले आहे.
