अमरावती: देशात नीट परीक्षा गैरव्यवहारावरून नुकतेच नवी दिल्लीत तरूणाईचे आंदोलन झाले. त्यावर सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले, संपूर्ण जगात बदलाचे वारे वाहत आहेत. आपल्या देशातही अलीकडे एक आंदोलन झाले. या जेन-झींना कुणी आपल्यावर हुकूमत गाजवणे आवडत नाही. त्यांना कुणाचे नेतृत्व चालत नाही. त्यातील प्रत्येक जण नेता आहे.

थोडा वेळ थांबणे महत्वाचे..

येथील पोटे एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या स्वामी विवेकानंद सभागृहात शनिवारी सायंकाळी आयोजित संवाद तरूणाईशी या कार्यक्रमात आपले विचार व्यक्त केले. मुंढे म्हणाले, तरूणांच्या आंदोलनाच्या वेळी आपण पाहिले, प्रत्येक जण का नेता आहे, तर प्रत्येकाच्या आशा, आकांक्षा आहेत. ध्येय आहे. ज्यांना आपण आळशी म्हणतो, ज्यांना आपण त्याबद्दल प्रश्न विचारतो, ती पिढी सर्वात जास्त हवामान बदलाविषयी बोलते. ही पिढी सर्वात जास्त तंत्रज्ञानाविषयी बोलते, त्यावर काम करते. ही पिढी मानसिक आजाराबद्दल उघडपणे बोलते. एखादी गोष्ट स्वीकारण्यासाठी जे धाडस लागते, ते या पिढीमध्ये आहे. तुम्ही त्यांच्या धैर्याला साथ देणार आहात की नाही, हा प्रश्न आहे.

बदलांना स्वीकारणे महत्वाचे

तुकाराम मुंढे म्हणाले, तरूणांच्या पिढीला आता यशाची व्याख्या काय हे समजून घ्यावे लागेल. आपण यश हे मोठे घर, मोठा पगार, मोठी गाडी यात मोजत असू. पण या छोट्या गोष्टी आहेत. जगातील सर्वच श्रीमंत हे यशस्वी झाले असते. पैशांची गरज आहे, पण केवळ पैसा म्हणजे यश नाही. तरूणाई ही सध्या मोबाईलच्या जास्तीत जास्त संपर्कात आहे. त्यातून माहिती मिळते, पण ती अल्गोरिदमच्या स्वरूपात आहे. आपल्याला आवडते तेच आपल्याला मोबाईलमध्ये दिसते. त्याच रील्स आपण पाहतो आणि आत्ममग्न होतो. दुसऱ्यांचे विचार आपण ऐकत नाही. ही खरी समस्या आहे.

आपण स्वातंत्र्यात आहोत का?

तुकाराम मुंढे म्हणाले, आपण इंग्रजांच्या गुलामगिरीत होतो. त्यातून आपल्याला स्वातंत्र्य मिळाले आहे. पण, आपण आता खरेच स्वातंत्र्यांत आहोत का, हा प्रश्न विचारायला हवा. जे विचारच तुमचे नाहीत, तुम्ही वेगळ्याच विचारांमध्ये गुरफटून गेले आहात, ते तुमच्यावर अल्गोरिदमने लादले आहे. तुम्ही तुमची विचार करण्याची क्षमता केली आहे, हे स्वत:हून ओढवून घेतले आहे. त्यामुळे आता थोडी विश्रांती घेऊन विवेकवादी विचार करण्याची गरज आहे.