अमरावती: राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे हे त्यांच्या धडाकेबाज कारवाईसाठी ओळखले जातात. सनदी अधिकारी म्हणून विविध विभागांत काम करताना, त्यांच्या कठोर भूमिकेमुळे त्यांची अनेकवेळा बदली झाली आहे. तुकाराम मुंढे यांनी यावर भाष्य केले आहे. मी ‘सिस्टिम’च्या विरोधात नाही, पण जो प्रवाह चालला आहे, तो योग्य दिशेने आहे का हे पाहणे मी महत्वाचे मानतो, असे ते म्हणाले.
वारंवार बदली का होते?
येथील पोटे एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या स्वामी विवेकानंद सभागृहात शनिवारी सायंकाळी आयोजित संवाद तरूणाईशी या कार्यक्रमात बोलताना तुकाराम मुंढे यांनी त्यांच्या जीवनातील अनुभवांविषयी मनमोकळेपणाने विचार मांडले. मुंढे म्हणाले, माझी वारंवार बदली होते, त्यावेळी माझे हितचिंतक मला म्हणतात, तुम्ही प्रवाहाच्या विरोधात का जाता. पाण्यात राहून मगरीशी वैर का घेता, असा प्रश्न देखील काही जण करतात, ‘सिस्टिम’मध्ये राहून ‘सिस्टिम’ बदलता येणार नाही, असाही सल्ला अनेक जण देतात. पण, माझा विचार वेगळा आहे. मी ‘सिस्टिम’च्या विरोधात नाही, माझे मगरीशीही वैर नाही. पण जो प्रवाह ज्या दिशेने वेगाने चालला आहे, तो योग्य दिशेने आहे की नाही, हेच मी पाहतो.
केवळ मतदान म्हणजे लोकशाही नव्हे
तुकाराम मुंढे म्हणाले, केवळ मतदानाची टक्केवारी वाढणे म्हणजे लोकशाही सुदृढ होणे नव्हे, तर नागरिक म्हणून आपण किती जागरूक आहोत, आपण विवेकवादी विचार करीत आहोत का, यावरून त्या देशातील लोकशाही ही समृद्ध होत असते. प्रवाहातील ओंडके म्हणून जगण्यापेक्षा प्रवाहाच्या विरोधात उंच उडी मारणाऱ्या माश्याप्रमाणे जगा. ओंडक्याला अस्तित्व नाही. माशाला अस्तित्व आहे, तो जिवंत आहे.
तरूणाईचे केले कौतुक
तुकाराम मुंडे यांनी तरूणाईचे कौतुक केले, ते म्हणाले, आजच्या तरूण पिढीला आळशी म्हटले जाते. पण, ही पिढी देश घडवणारी पिढी आहे. केवळ त्यांच्यासमोर जे काही प्रश्न आहेत, त्याची योग्यरित्या सोडवणूक करणे गरजेचे आहे. सध्या बेरोजगारीच्या मुद्यावर अनेक तरूण निराशेने बोलतात. नोकरीसाठी प्रयत्न करणे गरजेचे आहेच, पण कुणाला नोकरी निर्माण करणारे उद्योजक व्हावे लागेल. प्रत्येकाला देशाच्या विकासासाठी आपले योगदान द्यावे लागणार आहे. समाजासाठी आपण काय देणे लागतो, याचाही विवेकवादी विचार प्रत्येकाला करावा लागणार आहे.
