नागपूर : भाजप आमदार कृष्णा खोपडे यांनी सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्याविरोधात लक्षवेधी मांडत निलंबित करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. आता धमकीचे दोन कॉल आल्यानंतर कृष्णा खोपडे यांनी पुन्हा एकदा तुकाराम मुंढे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

कृष्णा खोपडे यांनी मी दाखल केलेल्या लक्षवेधीनंतर तुकाराम मुंढे घाबरला आहे. त्याच्याच सांगण्यावरून त्याच्या समर्थकांनी मला जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचा आरोप खोपडे यांनी केला आहे. कृष्णा खोपडे यांनी नागपूरचे पोलीस आयुक्त तसेच स्थानिक सीताबर्डी पोलीस स्टेशनमध्ये लेखी तक्रार दिली. त्यानंतर आता तुकाराम मुंढे यांच्या अटकेची मागणी होत आहे.

सरकारने मुंढेंना दिली क्लीन चिट

नागपूर महापालिकेचे तत्कालीन आयुक्त आणि स्मार्ट सिटी प्रकल्पाचे कार्यकारी मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या दोन प्रकरणांमध्ये झालेल्या चौकशीत ते निर्दोष असल्याचे सरकारने विधानसभेत सांगितले. महिला अधिकाऱ्यांशी गैरव्यवहारप्रकरणी मात्र चौकशी अंतिम टप्प्यात असून, अहवाल महिनाभरात सादर होईल, असे उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले.

पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना सामंत यांनी माहिती दिली. खोपडे यांनी मुंढे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. यानंतर तत्कालीन महापौर संदीप जोशी आणि आमदार प्रवीण दटके यांनी याप्रकरणी चौकशीची मागणी केली होती. या सर्व आरोपांवर उत्तर देताना मंत्री सामंत म्हणाले की, मुंढेंना स्मार्ट सिटीचे कार्यकारी सीईओ म्हणून काम करण्याचे अधिकार तत्कालीन बृहन्मुंबई आयुक्त प्रवीण परदेशी यांनी दिले होते.

दोन प्रकरणांमध्ये झालेल्या चौकशीत ते निर्दोष ठरले असून, महिला अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरील चौकशी राधिका रस्तोगी यांच्या अध्यक्षतेखाली सुरू आहे. ती अंतिम टप्प्यात असून, महिनाभरात अहवाल मिळाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, मुंढे प्रकरणात काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनी व्यापक चौकशीची मागणी केली. असेल तर कारवाई करा; निर्दोष असेल तर विषय एकदाचा संपवा, अशी सूचना केली होती.