अकोला : तुम्ही ‘ऑनलाइन ग्रोसरी’ मागवताय तर ही बातमी तुमच्यासाठीच. अत्यंत अस्वच्छता असलेल्या गोदामातून ‘ऑनलाइन ग्रोसरी’चा पुरवठा केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार अकोल्यात समोर आला आहे. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची त्यावर वक्रदृष्टी पडली असून प्रशासनाने थेट ‘ब्लिंकिट’चा परवानाच निलंबित केला. या कंपनीच्या गोदामाची दोन वेळा तपासणी केली. त्यामध्ये धूळ, कचऱ्यासह प्रचंड अस्वच्छता, अस्ताव्यस्त सामान आढळून आले होते.
नोटीस बजावूनही सुधारणा नाहीच
अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशान्वये अस्वच्छतेच्या पार्श्वभूमीवर सहायक आयुक्त (अन्न) दे. गो.वीर यांचे मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी र. व्दा. सोळंके यांनी शहरातील कवार नगर येथील मे. ब्लिंक कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेडची १२ ऑगस्ट रोजी तपासणी केली होती. त्या पेढीस १३ ऑगस्ट रोजी सुधारणा नोटीस बजावण्यात आली होती.
ऑनलाइन खुलासा; फेरतपासणीमध्ये आढळल्या प्रचंड त्रुटी
सुधारणा नोटीसवर २१ ऑगस्ट रोजी ऑनलाइन पद्धतीने खुलासा सादर केला. त्यानंतर ३१ ऑगस्ट रोजी ‘मे. ब्लिंक कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेड’ची फेरतपासणी करण्यात आली. त्याच दिवशी सुनावणी देखील घेण्यात आली. फेरतपासणीत आढलेल्या त्रुटींची पूर्तता न केल्याने पेढीचा परवाना निलंबित करण्यात आलेला आहे.
खाद्य पदार्थ व इतर साहित्य एकत्र; अस्वच्छतेचा कळस
अन्न व औषध प्रशासनाच्या तपासणीमध्ये ‘वॉक-इन चिलर व फ्रीझर’च्या प्रवेशद्वारावर प्लास्टिकचे पडदे खराब, फाटलेले व पिवळसर आढळले. रॅक व्यवस्थेत अपुरी जागा, प्रमाणापेक्षा जास्त उंची व अयोग्य डिझाइनमुळे स्वच्छतेत अडथळा निर्माण होतो. खाद्यपदार्थ व अखाद्य साहित्य एकाच एकत्र साठवले गेले होते. अन्न पदार्थाचे खोके व साहित्याची पाकिटे थेट जमिनीवर अस्ताव्यस्त ठेवलेली आढळली. रॅकखाली मोठ्या प्रमाणात धूळ व कचरा आढळून आला. स्वच्छतेचे कुठलेही वेळापत्रक नव्हते.
बिले व अंकेक्षण अहवाल सादर करण्यास टाळाटाळ
अन्न हाताळणारे कामगार हातमोजे व हेड टोपी न वापरता काम करीत होते. खरेदी-विक्री बिले व अंकेक्षण अहवाल तपासणीसाठी सादर केले नाहीत, असे अन्न व औषध प्रशासनाकडून सांगण्यात आले. मोठ्या कंपनीच्या गोदामावर अन्न व औषध प्रशासनाने कारवाई करून परवाना निलंबित केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. ऑनलाइन सेवा देतांना संबंधित कंपनीकडून योग्य काळजी घेतली जात नसल्याचेही स्पष्ट होते.
