नागपूर : अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सावजी खाद्याबाबत केलेल्या वक्तव्याचे पडसाद आता कायदेशीर पातळीवर उमटू लागले आहेत. हलबा समाज युवा संघटनेने त्यांच्या विरोधात तहसील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून कारवाईची मागणी केली आहे. दुसरीकडे, वाढत्या वादानंतर मुंढे यांनी प्रथमच सविस्तर स्पष्टीकरण देत आपण केवळ स्वतःच्या अनुभवाबद्दल बोललो होतो, असे सांगत सावजी किंवा नागपूरच्या खाद्यसंस्कृतीचा अवमान करण्याचा हेतू नसल्याचे स्पष्ट केले.

सावजी वक्तव्यावरून वाद का निर्माण झाला?

अमरावती येथील एका कार्यक्रमात तुकाराम मुंढे यांनी सावजी खाद्याबाबत केलेल्या वक्तव्यानंतर विदर्भात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. सावजी व्यावसायिक, हलबा आणि कोष्टी समाजासह विविध संघटनांनी या वक्तव्याचा निषेध केला. सावजी ही केवळ खाद्यपद्धती नसून विदर्भाची सांस्कृतिक ओळख असल्याने या वक्तव्यामुळे समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला. समाजमाध्यमांवरही या विषयावर मोठ्या प्रमाणात चर्चा रंगली.

पोलिसांत कोणती तक्रार दाखल झाली?

हलबा समाज युवा संघटनेने तहसील पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे. तक्रारीत तुकाराम मुंढे यांच्या वक्तव्यामुळे सावजी समाजाचा आणि विदर्भाच्या खाद्यसंस्कृतीचा अवमान झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाची चौकशी करून संबंधित कायदेशीर तरतुदींनुसार कारवाई करावी, अशी मागणी संघटनेने केली आहे.

तुकाराम मुंढे यांनी काय स्पष्टीकरण दिले?

वाद वाढल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी प्रथमच सविस्तर भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, “मी फक्त माझ्याबाबत बोललो होतो. सावजी खाल्यास मी महिनाभर आजारी पडेन, असे म्हटले होते. दुसऱ्यांनी सावजी खावे किंवा खाऊ नये, असे मी कधीच सांगितले नाही. २००८-०९ मध्ये नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असताना मित्राच्या आग्रहाखातर प्रथमच सावजीची चव घेतली होती. एक घास झाल्यावर ते तिखट लागल्यावर मी जेवण सोडून निघून गेलो. अन्न व औषध प्रशासन विभागाचा आयुक्त म्हणून जास्त तेलकट अन्न टाळून आरोग्यदायी आहार घ्यावा, एवढाच माझ्या वक्तव्याचा हेतू होता.

वादानंतरही प्रकरण शांत होणार का?

मुंढे यांच्या स्पष्टीकरणानंतरही वाद शमण्याची चिन्हे दिसत नाहीत. विविध सामाजिक संघटना आणि सावजी व्यावसायिकांनी नाराजी कायम ठेवली आहे. आता पोलिसांकडे तक्रार दाखल झाल्याने हे प्रकरण कायदेशीर टप्प्यावर पोहोचले असून, तक्रारीवर पोलीस काय निर्णय घेतात आणि पुढे कोणती कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.