अकोला : तुकाराम मुंढे यांच्या अन्न व औषध प्रशासनाकडून भेसळ रोखण्यासाठी कारवाईची मोहीम उघडली आहे. विविध हॉटेल व्यावसायिकांवर कारवाई केल्यानंतर आता तेलाकडे मोर्चा वळवण्यात आला. सोयाबीन तेलामध्ये भेसळीच्या संशयावरून अकोल्यात दोन कारखान्यांवर अन्न व औषध प्रशासनाने कारवाई केली. यावेळी एकूण ११.८२ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दोन्ही कारखान्यांचे परवाने निलंबित करण्यात आले. या कारवाईमुळे मोठी खळबळ उडाली.
सणासुदीच्या तोंडावर तेलाच्या मागणीसोबतच भेसळीमध्येही वाढ
सणासुदीच्या तोंडावर तेलाच्या मागणीत वाढ होते. या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात भेसळ होते. भेसळयुक्त तेल आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरते. तेलातील भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने तपासणीची विशेष मोहीम सुरू केली. यामध्ये शहरातील औद्योगिक वसाहत परिसरात दोन कारखान्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. यात तेलाचा साठा जप्त केला.
तपासणीसाठी प्रयोगशाळाच नाही
औद्योगिक वसाहत परिसरात मे. प्रभुदयाळ लक्ष्मीनारायण पेढीची तपासणी केली. रिफाइंड सोयाबीन तेलाचे नमुने घेण्यात आले. सुटे तेलाची विक्री, प्रयोगशाळा नसणे, प्रयोग शाळेचे अहवाल नसणे, पुनर्वापर, भेसळीच्या संश्यावरून, रिपार्कची परवानगी असताना ट्रेडिंग करत होते. इतर त्रुटी असल्याने सहा लाख २१ हजार ३०० रुपयांचे तीन हजार ४२८. ४०० किलो तेल जप्त केले. ही कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी किशोर बोरचाटे यांनी केली.
सुटे तेलाची अवैध विक्री
दुसरी कारवाई औद्योगिक वसाहत परिसरातील भरतकुमार ॲण्ड ब्रदर्स यावर करण्यात आली. तपासणी करून रिफाइंड सोयाबीन तेलाचे नमुने घेण्यात आले. उर्वरित साठा भेसळीच्या संशय, प्रयोगशाळा अद्ययावात नसणे, सुटे तेल विक्री करणे, प्रयोगशाळेचे अहवाल नसणे व इतर त्रुटीच्या आधारे पाच लाख ६१ हजार ३५० रुपयांचे तीन हजार ५९८.४०० किलो तेल जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी रवींद्र सोळंके यांनी केली. कारवाई झालेले दोन्ही रिपॅकर तेल यासाठी परवाना धारक आहेत.
तपासणीमध्ये आढळल्या गंभीर त्रुटी
तपासणीमध्ये आढळून आलेल्या गंभीर त्रुटीच्या आधारे दोन्हीचे परवाना पुढील आदेशापर्यंत तत्काळ निलंबित केले आहेत. दोन्ही कारवाई आयुक्त तुकाराम मुंढे व सहआयुक्त अमरावती सचिन केदारे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. आगामी काळात मोहिमेला व्यापक स्वरूप देऊन नियमित कारवाई केली जाणार असल्याचे अकोल्यातील अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त देवानंद वीर यांनी सांगितले.
