वर्धा : अन्न व औषधी प्रशासन विभागाच्या आयुक्तपदी तुकाराम मुंढे आले आणि राज्यात खाद्य पदार्थात जणू क्रांतीची लाट आली. साधी पाणीपुरी असो की मोठे नट जाहिरात करीत असलेला गुटका. कोणीच सुटले नाही आणि आताही दंड, विक्री मनाई, परवाना रद्द हे शब्द परवलीचे ठरू लागले आहे. काही तर कारवाई होण्याआधीच स्वच्छ होवू लागले आहे. त्यातलाच हा प्रकार आहे.

बुढ्ढी के बाल

असा व्यक्ती विरळाच ज्याने बुढी के बाल म्हणजेच Cotton Candy हा पदार्थ चाखला किंवा पाहला नसेल. लहानपणी याचे गुब्बारे घेऊन मिरविण्याचा आनंद काही औरच. पण आता हे खाद्य परिचित अशा गुलाबी किंवा लाल रंगात मिळणार नाही. कारण मुंढे यांच्या खात्याचे लक्ष गेले तर काही खैर नाही, अशी भीती.

ही आहे भेसळ

अन्न सुरक्षा कायद्यानुसार खाद्य पदार्थात औद्योगिक रंगाचा ( Non edible Dyes ) वापर करणे बेकायदेशीर आहे. या बुढ्ढी के बाल पदार्थात असे दिसले. म्हणजे कृत्रिम घातक रंग आढळले. या पदार्थास म्हणजे कॉटन कँडीस आकर्षक करण्यासाठी कापड उद्योगात वापरल्या जाणाऱ्या ‘ रोडामाईन – बी ‘ या रासायनिक रंगाचा वापर होत आहे. हे रसायन मानवी शरीरासाठी अत्यंत अपायकारक समजल्या जाते. त्यामुळे कर्करोग, यकृताचे आजार व अन्य गंभीर व्याधी होण्याची शक्यता बळावते.

अन्न व औषधी प्रशासन

या खात्याने आता खाद्य पदार्थात वापरल्या जाणाऱ्या काही घातक व मान्यता नसलेल्या कृत्रिम रंगावर कडक बंदी घातली आहे. त्यावर बोट ठेवून असंख्य पदार्थ बंद झाले. FDA ने विविध जत्रा, पार्क, फुटपाथ विक्रेते यांच्याकडून अश्या पदार्थांचे नमुने घेत ते प्रयोगशाळेत तपासणीस पाठविले. आणि घातक रंग आढळलेल्या खाद्य पदार्थास मनाई केली. त्यांचे साठे जप्त केले. कॉटन कँडी यावर पांडेचेरी व अन्य राज्यात पूर्वीपासून मनाई आहेच. आता महाराष्ट्रात.

सोशल मीडियावर चर्चा

बुढ्ढी के बाल हा तसा चिरपरिचित पदार्थ. त्यावरील घडामोड लक्ष वेधणार नाही तर नवलच. ‘ असली बुढ्ढी के बाल अब वापस ‘ अशी एक टिपणी आहे. म्हणजे आजीबाईचे शुभ्र पांढरे केस आले परत.