नागपूर : आपल्या सभोवती अन्न आणि औषधांमध्ये भेसळ होत असल्याची, बनावट औषधांची, नकली कॉस्मेटिक उत्पादने किंवा इतर गैरव्यवहार झाल्याची माहिती मिळाल्यास नागरिकांनी त्वरित कारवाईसाठी अन्न व औषध प्रशासन (एफ. डी. ए.) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर थेट तक्रार करण्याचे आवाहन समाजमाध्यमांवर तुकाराम मुंढे समर्थकांच्या वतीने तयार फेसबुक खात्यातर्फे करण्यात आले आहे.
फेसबुक, व्हाट्सएप आणि इतरही समाजमाध्यमांवर सुरू असलेल्या मोहिमेमुळे राज्यातील नागरिकांना मोठी सुविधा मिळणार असून भेसळ, गैरव्यवहार आणि बनावट उत्पादनांविरोधात मोहीम प्रभावी होईल, असा समर्थकांचा दावा आहे.
काय तक्रार करता येईल?
नागरिक कोणत्याही प्रकारच्या भेसळयुक्त अन्नपदार्थ, बनावट औषधे, नकली कॉस्मेटिक्स तसेच इतर गैरव्यवहार व फसवणूक यासंबंधी तक्रार करू शकतात. यासाठी संबंधित उत्पादन, त्याचा प्रकार, बनावट असल्याची शक्यता आणि गैरव्यवहाराचे तपशीलवार वर्णन करणे आवश्यक आहे.
तक्रारीसाठी कोणती माहिती द्यावी?
तक्रार करताना नागरिकांनी पूर्ण माहिती, लोकेशन, फोटो किंवा व्हिडिओ पुरावे आणि संबंधित व्यक्ती किंवा संस्थेचे नाव पाठवावे. यासह उत्पादन कोणी तयार केले, कोणत्या ठिकाणी मिळाले व त्याचा प्रकार काय आहे हे स्पष्ट करणे गरजेचे आहे. यामुळे प्रशासनाला योग्य कारवाई करण्यास मदत होईल.
तक्रारी पाठवल्यावर काय होईल?
योग्य पुरावे मिळाल्यास प्रशासनाकडून त्वरित तपास सुरू केला जाईल. भेसळखोरांविरुद्ध FDA अंमलबजावणी मोडेमध्ये येईल आणि संबंधितांवर कडक कारवाईची शक्यता असेल. प्रशासनासह स्थानिक अधिकाऱ्यांकडून देखील तत्काळ कारवाई केली जाईल. योग्य माहिती मिळाल्यासच कठोर कारवाई होऊ शकते, त्यामुळे अर्धवट किंवा अपूर्ण माहिती पाठवणे टाळावे.
कसा पाठवावा?
नागरिकांनी इंस्टाग्रामवर थेट DM करून तुकाराम मुंढे यांच्या अधिकृत हँडल @tukaram_ias वर तक्रार पाठवावी. पुराव्यांसह माहिती पाठवल्यास प्रशासनास कार्यवाहीसाठी योग्य सहाय्य मिळेल. FDA आयुक्त तुकाराम मुंढे समर्थक नावाने असलेल्या फेसबुक अकाऊंटवरून नागरिकांना एकत्र येऊन जबाबदारीने सहभाग घेण्याचे आवाहन केले आहे. नागरिकांचा सक्रिय सहभाग हीच भेसळ व बनावट उत्पादनांविरोधातील प्रभावी कारवाईची गुरुकिल्ली आहे. चला सर्व मिळून आपल्या परिसराला सुरक्षित बनवण्यासाठी जबाबदारीने साथ देऊया, असे आवाहनही समर्थकसंकडून करण्यात आले आहे. त्यामुळे या मोहिमेला कसा प्रतिसाद मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
