नागपूर : कठोर आणि नियमप्रिय अधिकारी अशी ओळख असलेले तुकाराम मुंढे यांनी सोमवारी अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभागाच्या आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला आहे. त्यानंतर विभागातील हालचालींना वेग आला आहे. मात्र, त्यांच्या समोर केवळ शिस्तीचे आव्हान नसून राज्यभर वाढत असलेली बनावट औषधांची साखळी, अन्न भेसळ, ऑनलाइन औषधविक्री, परवाना प्रक्रियेतील अनियमितता आणि मनुष्यबळाची कमतरता यांसारखी गंभीर आव्हाने उभी आहेत. त्यामुळे मुंढे एफडीएत कोणती कार्यपद्धती राबवतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

एफडीएमध्ये तुकाराम मुंढेंपुढे सर्वात मोठे आव्हान कोणते असेल?

राज्यात बनावट औषधे आणि मुदतबाह्य औषधांची विक्री हा सर्वात गंभीर मुद्दा मानला जात आहे. ग्रामीण भागात तसेच छोट्या शहरांमध्ये डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषधविक्री होत असल्याच्या तक्रारी वारंवार समोर येतात. यावर कठोर नियंत्रण ठेवणे हे मोठे आव्हान असेल.

ऑनलाइन औषधविक्री एफडीएसाठी डोकेदुखी का ठरत आहे?

ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरून औषधांची विक्री वाढत आहे. अनेक वेळा नियमांचे पालन न करता औषधे ग्राहकांपर्यंत पोहोचत असल्याचे आरोप झाले आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध खरेदीचे प्रमाण वाढल्याने आरोग्याचा धोका निर्माण होत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.

अन्न भेसळीचा मुद्दा किती गंभीर आहे?

सणासुदीच्या काळात मिठाई, तेल, मसाले, दूध आणि इतर खाद्यपदार्थांमध्ये भेसळीच्या तक्रारी सातत्याने समोर येतात. अनेक ठिकाणी निकृष्ट दर्जाचे अन्नपदार्थ विकले जात असल्याच्या कारवाया यापूर्वीही झाल्या आहेत. त्यामुळे नियमित नमुना तपासणी आणि धडक कारवाया वाढवण्याची मागणी होत आहे.

एफडीए विभागात अंतर्गत पातळीवर कोणती आव्हाने आहेत?

विभागात मनुष्यबळाची कमतरता, प्रलंबित फाईली, तपासण्यांचा कमी वेग आणि परवाना प्रक्रियेतील विलंब हे मुद्दे गंभीर मानले जातात. अनेक जिल्ह्यांमध्ये निरीक्षकांची पदे रिक्त असल्याने कारवाईवर परिणाम होत असल्याची चर्चा आहे.

परवाना प्रक्रियेबाबत कोणते प्रश्न उपस्थित होतात?

औषध दुकाने, अन्न व्यवसाय आणि उत्पादन युनिट्सना परवाने देताना पारदर्शकतेचा अभाव असल्याच्या तक्रारी वेळोवेळी समोर येतात. काही प्रकरणांत नियमांचे उल्लंघन करून परवान्यांना मंजुरी दिल्याचे आरोपही झाले आहेत. त्यामुळे प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि तंत्रज्ञानाधारित करण्याचे आव्हान मुंढेंपुढे असेल.

अधिकारी-कर्मचारी आणि विक्रेत्यांमध्ये धास्तीचे वातावरण का आहे?

तुकाराम मुंढे हे अचानक पाहण्या, कठोर निर्णय आणि शिस्तप्रिय कामकाजासाठी ओळखले जातात. त्यामुळे एफडीएमध्ये प्रलंबित प्रकरणे, कार्यालयीन शिस्त आणि तपासण्यांबाबत आता अधिक कठोर भूमिका घेतली जाऊ शकते, अशी चर्चा सुरू आहे. त्यामुळे काही अधिकारी आणि औषध विक्रेत्यांमध्ये धास्तीचे वातावरण निर्माण झाले आहे.

ग्राहक संघटना आणि आरोग्य क्षेत्राची अपेक्षा काय आहे?

ग्राहक संघटना, रुग्ण हक्क कार्यकर्ते आणि आरोग्य क्षेत्रातील काही तज्ज्ञांनी कठोर कारवाईची गरज व्यक्त केली आहे. बनावट औषधांविरोधात मोठी मोहीम, अन्न भेसळ रोखण्यासाठी विशेष पथके आणि ऑनलाइन विक्रीवर नियंत्रण अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

तुकाराम मुंढे ‘झगडे पॅटर्न’ राबवतील का?

माजी आयुक्त महेश झगडे यांच्या काळात एफडीएमध्ये धडक कारवाया आणि शिस्तीची कठोर अंमलबजावणी पाहायला मिळाली होती. तुकाराम मुंढे यांच्या नियुक्तीनंतर पुन्हा त्याच प्रकारच्या आक्रमक कारवायांची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, मुंढे स्वतःची वेगळी कार्यशैली निर्माण करतात की ‘झगडे पॅटर्न’ पुढे नेतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.