नागपूर : अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त म्हणून रुजू झाल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी महाराष्ट्रात भेसळयुक्त अन्न, अस्वच्छता आणि नियमबाह्य वस्तुंविरुद्ध अत्यंत आक्रमक आणि व्यापक कारवाईचा धडाका लावला आहे. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात ३,००० हून अधिक ठिकाणी धाडी टाकून हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांची कसून तपासणी करण्यात आली. आता त्यांनी गणेशोत्सवात भंडारा आणि महाप्रसाद कार्यक्रमांसाठी अधिकृत नोंदणी किंवा परवाना बंधनकारक केला आहे. यावरून हिंदुत्ववादी संघटनांनी त्यांना लक्ष्य केले आहे.
या हिंदुत्ववादी संघटनेने केली टीका
खाद्य सुरक्षेच्या नावाखाली केवळ हिंदूंच्या सण-उत्सवांना लक्ष्य का केले जात आहे, असा सवाल हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक सुनील घनवट यांनी उपस्थित केला आहे. तुकाराम मुंढे चांगले काम करीत असले, तरी केवळ हिंदूंच्या सण-उत्सवांना लक्ष्य करण्याची भूमिका अजिबात स्वीकारली जाणार नाही, असा इशाराही घनवट यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून केला आहे. अन्न सुरक्षेच्या नावाखाली केवळ हिंदूंच्या धार्मिक परंपरांना परवाने, नोंदणी आणि नियमांत अडकवण्याचा हा प्रयत्न अत्यंत पक्षपाती व प्रशासकीय दुटप्पीपणाचे उत्तम उदाहरण असल्याचे ते म्हणाले.
इतर धर्मियांच्या सणांनाही नियम लागू करा
बकरी ईद, रमझान ईद, इफ्तार पार्ट्या, नाताळ किंवा गुड फ्रायडे यांसारख्या इतर धर्मीयांच्या सणांच्या वेळी शिजवले जाणारे अन्न आणि सार्वजनिक अन्न वितरण मुंढे यांच्या विभागाला दिसत नाही का, त्यावेळी अन्न सुरक्षेच्या नियमांचे पालन केले जाते का, याचे उत्तर प्रशासनाने द्यावे. इतर धर्मीयांच्या सणांनाही हे नियम लागू करून त्यावर कारवाई केली जाणार का, हे विभागाने जाहीर करावे, अशी मागणी त्यांनी केली. भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद १४ नुसार कायदा सर्वांना समान लागू झाला पाहिजे, तसेच अनुच्छेद १५ अनुसार शासनाला धर्माच्या आधारावर भेदभाव करता येत नाही, असेही घनवट म्हणाले.
मंत्रालय, आमदार निवासातील अन्नाच्या दर्जाचा अहवाल सार्वजनिक करावा
मंत्रालय, आमदार निवास आणि सर्व शासकीय कँटीन्सची झाडाझडती घेऊन तिथल्या अन्नाच्या दर्जाचा अहवाल सार्वजनिक करावा. हिंदूंची मंदिरे, गणेशोत्सव आणि नवरात्रीतील सार्वजनिक मंडळांना परवान्यांच्या नावाखाली त्रास देण्याचा प्रकार करू नये. तसेच अन्नदानाच्या सेवाभावी प्रक्रियेत बाधा निर्माण करू नये, असे घनवट यांनी नमुद केले.
काय आहे अन्न व औषध विभागाचे निर्देश
अन्न व औषध विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कोणत्याही मोठ्या कार्यक्रमात अन्नवाटप करण्यापूर्वी आयोजकांना अधिकृत नोंदणी किंवा परवाना घेणे आवश्यक केले आहे. या नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर कडक कारवाई केली जाणार आहे. नव्या मार्गदर्शक सूचनांमध्ये स्वच्छतेच्या दृष्टीने अनेक अटी समाविष्ट करण्यात आल्या आहेत. अन्न तयार करताना आणि वाटप करताना मास्क, हातमोजे वापरणे तसेच स्वयंपाकासाठी आणि पिण्यासाठी आरओ पाण्याचा वापर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. महाप्रसाद तयार करणाऱ्या आणि वाटप करणाऱ्या स्वयंसेवकांनी डोक्यावर टोपी घालणे आवश्यक आहे. अन्न साठवण्यासाठी आणि वाटपासाठी केवळ स्टेनलेस स्टील किंवा अन्नसुरक्षेच्या दृष्टीने योग्य असलेल्या भांड्यांचाच वापर करावा लागणार आहे. तसेच शिळे अन्न भाविकांना वाटप केल्याचे आढळल्यास आयोजकांवर कठोर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
