नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर शहरात सणासुदीच्या खरेदीदरम्यान खाद्यपदार्थांच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखालील अन्न व औषध प्रशासनाने २३ ते २७ सप्टेंबरदरम्यान नागपूरसह भंडारा व चंद्रपूर जिल्ह्यांत तपासणी केली. चक्रफूल, मनुका, खाद्यतेल, तांदूळ, दूध आणि मिठाईसह जप्त व नष्ट केलेल्या साठ्याची किंमत प्रशासनाने ३२ लाख ७४ हजार ५४३ रुपये दिली आहे. नेमकी कारवाई कुठे झाली आणि ग्राहकांनी काय लक्षात घ्यावे? याबाबत आपण जाणून घेऊ या.
नागपुरात कोणत्या पदार्थांवर मोठी कारवाई झाली?
आमसर अँड कंपनी व उंझा रायपूर ट्रान्सपोर्ट येथील १,९९७.६ किलो चक्रफूल कृत्रिम रंगाचा वापर आणि दर्जाबाबत संशयावरून जप्त झाले. त्याची किंमत ६.२२ लाख रुपये आहे. न्यू नागपूर कोल्ड स्टोरेजमधील समधा कॉर्पोरेशन व मंत्री ट्रेडिंग प्रा. लि. यांच्याकडील ७३६ किलो मनुका लेबलदोष आणि दर्जाच्या संशयावरून ताब्यात घेण्यात आला. त्याची किंमत ६.२८ लाख रुपये आहे.
तेल आणि तांदळात काय आढळले?
नागपूरच्या जय माता दी ट्रेडिंग कॉर्पोरेशन, काटोलच्या खात्री ट्रेडर्स आणि गोंदियाच्या जयबाबा ट्रेडर्सकडील ५.८८ लाख रुपयांचे सोयाबीन व सूर्यफूल तेल जप्त झाले. जाहिरात आणि उत्पादनाबाबतच्या दाव्यांच्या नियमांचे उल्लंघन, तसेच दर्जाबाबत संशय, अशी कारणे प्रशासनाने दिली. कळमना धान्य बाजारातील प्रकाश ट्रेडिंग कंपनी व जमनादास जनिमल यांच्याकडील १०,४३६ किलो तांदूळ पॅकिंग व लेबलविषयक नियमांच्या उल्लंघनाप्रकरणी जप्त झाला.
मिठाई व दुग्धजन्य पदार्थांचे काय?
नागपुरातील अरुण डेअरी प्रॉडक्ट्समधून अस्वच्छ साठवणुकीप्रकरणी दूध, रसगुल्ले व साखर जप्त झाली. वर्धमान खोवा भांडार आणि गोकुळपेठेतील कल्याण एंटरप्रायझेसकडील खोवा व तुपाच्या दर्जाबाबत संशय व्यक्त करण्यात आला. भंडाऱ्यातील अंबिका स्वीट्समधून मोतीचूर लाडू, चॉकलेट बर्फी, कुंदा, मैदा व बटाटे ताब्यात घेण्यात आले. तुमसरमधील सचिन मिल्क अँड फूड प्रॉडक्ट्सकडील ५० किलो पनीर नाशवंत असल्याने जागीच नष्ट करण्यात आले.
दर्जा निकृष्ट असल्याचे सिद्ध झाले आहे का?
सर्व जप्त पदार्थ निकृष्ट किंवा भेसळयुक्त असल्याचे अद्याप सिद्ध झालेले नाही. काही कारवाया संशयित दर्जावर, तर काही विनापरवाना व्यवसाय, अस्वच्छता आणि लेबलदोषांवर झाल्या आहेत. त्यामुळे येत्या काळात प्रयोगशाळेतून उपलब्ध होणारे विविध तपासणीचे अंतिम निष्कर्ष पुढील कारवाईसाठी महत्त्वाचे ठरतील. त्यामुळे या अहवालाकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
