नागपूर : तुकाराम मुंढे यांच्या अन्न व प्रशासन विभागाने नागपुरातील प्रसिद्ध मिठाई उत्पादक ‘हिरा स्विट प्रा. लि.’च्या पाचपावली येथील उत्पादन युनिटवर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मोठी कारवाई केली आहे. नियमित तपासणीत एका भिंतीजवळ मृत उंदीर तसेच स्वच्छतेतील अनेक त्रुटी आढळल्यानंतर कारखान्याचा उत्पादन परवाना पुढील आदेशापर्यंत निलंबित करण्यात आला असून संबंधित युनिटमधील उत्पादनही थांबवण्यात आले आहे.

एफडीएने हिरा स्विटवर नेमकी कोणती कारवाई केली?

अन्न व औषध प्रशासनाने नागपुरातील पाचपावली येथील ‘हिरा स्विट प्रा. लि.’च्या उत्पादन युनिटचा उत्पादन परवाना पुढील आदेशापर्यंत निलंबित केला आहे. या कारवाईनंतर संबंधित उत्पादन युनिटमधील उत्पादनही थांबवण्यात आले आहे.

कारवाईचे कारण काय ठरले?

एफडीएच्या नागपूर अन्न शाखेच्या अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी ३ जुलै रोजी नियमित तपासणी केली. या तपासणीत कारखान्याच्या परिसरातील एका भिंतीजवळ मृत उंदीर आढळला. अधिकाऱ्यांनी तो उत्पादन साहित्यापासून दूर असल्याची नोंद केली. तसेच काही ठिकाणी धूळ व घाण, काही भांड्यांना गंज, लोखंडी पत्र्यांवर गंज आणि स्वच्छतेशी संबंधित इतर त्रुटीही निदर्शनास आल्या.

पुढे कोणती प्रक्रिया झाली?

तपासणीनंतर अधिकाऱ्यांनी आवश्यक नोंदी करून कंपनीला नोटीस बजावली. त्यानंतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून ६ जुलै रोजी उत्पादन परवाना पुढील आदेशापर्यंत निलंबित करण्यात आला.

या कारवाईचा कंपनीच्या व्यवसायावर काय परिणाम झाला?

परवाना निलंबित झाल्यानंतर पाचपावली येथील संबंधित उत्पादन युनिटमधील उत्पादन पूर्णपणे थांबवण्यात आले आहे.

हिरा स्विटची उत्पादने कुठे विकली जातात?

हिरा स्विटच्या मिठाई आणि नमकीनची विक्री देशातील विविध बाजारपेठांसह परदेशातील काही बाजारपेठांमध्येही केली जाते. त्यामुळे या कारवाईची माहिती समोर आल्यानंतर मिठाई उद्योगात खळबळ उडाली आहे.

ही कारवाई संपूर्ण कंपनीवर आहे का?

नाही. हिरा स्विटच्या सध्या दोन स्वतंत्र फर्म असून त्या दोन भावांच्या मालकीच्या आहेत. एफडीएची कारवाई केवळ पाचपावली येथील एका उत्पादन युनिटपुरती मर्यादित आहे. दुसऱ्या भावाच्या उत्पादन युनिटचा या कारवाईशी कोणताही संबंध नसल्याची माहिती आहे. तसेच शहरातील विक्री केंद्रांबाबत या आदेशात कोणताही उल्लेख करण्यात आलेला नाही.

कंपनीची भूमिका काय आहे?

या प्रकरणात कंपनीची बाजू जाणून घेण्यासाठी ‘हिरा स्विट प्रा. लि.’चे संचालक महेश वझिरानी यांच्याशी दूरध्वनीवर सहा वेळा संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसेच त्यांना दूरध्वनी आणि व्हॉट्सॲपद्वारे संदेशही पाठविण्यात आला. मात्र वृत्त लिहिपर्यंत त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नव्हता.

आता पुढे काय होणार?

एफडीएच्या माहितीनुसार, कंपनीने तपासणीत नमूद केलेल्या सर्व त्रुटी दूर कराव्या लागतील. त्यानंतर कंपनी अपील करू शकते. अपील मिळाल्यानंतर एफडीएकडून पुन्हा तपासणी केली जाईल. आवश्यक सुधारणा झाल्याचे आढळल्यास नियमानुसार परवाना निलंबन मागे घेण्याबाबत निर्णय घेतला जाईल.

एफडीएचे सहआयुक्त सचिन केदारे काय म्हणाले?

“पाचपावली येथील हिरा स्विट प्रा. लि.च्या उत्पादन युनिटच्या तपासणीत एका भिंतीजवळ मृत उंदीर आढळला. तसेच स्वच्छतेशी संबंधित इतर त्रुटीही निदर्शनास आल्या. त्यामुळे तेथील उत्पादन परवाना पुढील आदेशापर्यंत निलंबित केला. कंपनीने त्रुटी दूर केल्यानंतर तपासणी करून नियमानुसार पुढील निर्णय घेतला जाईल.” – सचिन केदारे, सहआयुक्त, अन्न व औषध प्रशासन विभाग (अन्न), नागपूर.