अमरावती: अन्नातील भेसळ, अस्वच्छ हॉटेल्स आणि खाद्य सुरक्षेच्या मुद्यांवर गेल्या काही महिन्यांत राज्यात धडक कारवाई मोहीम राबवली जात आहे. यामुळे अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे हे चर्चेत आहेत. त्यातच आता अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) आदेशानुसार शिक्षण विभागाने शालेय पोषण आहार पुरवणाऱ्यांना नोंदणी आणि परवाना बंधनकारक केला आहे. यासंदर्भात विभागीय उपसंचालक, शिक्षणाधिकाऱ्यांना पत्राद्वारे सूचना दिल्या आहेत.

‘जंक फूड’वर बंदी

प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेंतर्गत ग्रामीण व शहरी भागातील शाळा व्यवस्थापन समिती, बचतगट, स्वयंसहायता गट तसेच अशासकीय संस्था, स्वयंसेवी संस्थांमार्फत योजनेचा लाभ देण्यात येतो. या सर्वांना ‘एफएसएसएआय’ नोंदणी आणि परवाना घेणे आवश्यक आहे. तथापि वैध ‘एफएसएसएआय’ परवाना असल्याची खात्री करण्याची जबाबदारी शाळा व्यवस्थापनाची राहील. तसेच शाळास्तरावर अन्न शिजवून देण्यात येते, त्या सर्व शाळांना ‘एफएसएसएआय’ नोंदणी करणे बंधनकारक आहे. संतृप्त चरबी, ट्रान्स फॅट, अतिरिक्त साखर व सोडियमचे प्रमाण जास्त असलेले अन्नपदार्थ (जंक फूड) यांची शाळा परिसरात व परिसराच्या ५० मीटर अंतरात विक्री, वितरण व जाहिरात करण्यास सक्त मनाई आहे.

पिण्याचे पाणी सुरक्षित असावे

भोजनसूचीमध्ये योग्य प्रमाणात स्थूल पोषकतत्वे म्हणजे कर्बोदके, प्रथिने व स्निग्ध पदार्थ तसेच लोह, कॅल्शियम, जीवनसत्त्व अ, जीवनसत्त्व ड, आयोडीन यांसारखी सूक्ष्म पोषकतत्वे, आहारातील तंतुमय पदार्थ आणि पुरेशा प्रमाणातील द्रवपदार्थ यांची उपलब्धता सुनिश्चित करण्यात यावी. विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येणारे पिण्याचे पाणी सुरक्षित, पिण्यायोग्य आणि अधिनियमांतर्गत विहित मानकांनुसार असावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.

‘इट राईट कॅम्पस’ आराखडा

अन्न सुरक्षा व मानके (शाळेतील मुलांसाठी सुरक्षित अन्न आणि संतुलित आहार) विनियम, २०२० मधील विनियम ४ (१) अन्वये प्रत्येक शाळेला ‘ईट राइट कॅम्पस’ आराखडा स्वीकारण्यासाठी प्रोत्साहित करणे अपेक्षित आहे. अधिनियमाच्या कलम ३० अंतर्गत अधिकारांचा वापर करून अन्न सुरक्षा आयुक्त यांनी प्रत्येक शाळेला सदर आराखडा स्वीकारून त्याची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिलेले आहेत.

जनजागृती आवश्यक

शाळा प्राधिकरण, शाळा व्यवस्थापन तसेच शाळा व्यवस्थापन समितीने अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांच्या समन्वयाने पालक आणि विद्यार्थ्यांना अन्न सुरक्षेविषयी संवेदनशील व जागरूक करावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.