वर्धा : अन्न शुद्धता व स्वच्छता हा सध्या राज्यात परवलीचा शब्द ठरला आहे. कारण एकच, राज्याचे अन्न व औषधी प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे. पानटपरी ते मोठी हॉटेल, कंपन्यांचे किचन ते शाळेचे स्वयंपाकगृह… हे कसे असावे त्याचा दंडक मुंढे यांनी घालून दिला. पण सर्वाधिक गदारोळ उठला तो शालेय पोषण आहारबाबत. मुख्याध्यापक संघटनेने तर आम्ही शिक्षक, व्यापारी नव्हेत. आम्हास परवाने घेण्यास सांगू नका, असा इशाराच देऊन टाकला होता. पण अखेर शालेय प्रशासनानेच एक पाऊल स्वच्छतेच्या दिशेने टाकले आणि मुंढे कोप शांत करण्याची भूमिका घेतली आहे.

सुरक्षित, पौष्टिक आहार

राज्यातील प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांमध्ये राबविल्या जाणाऱ्या ‘प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजने’ (PM-POSHAN) अंतर्गत विद्यार्थ्यांना दिला जाणारा आहार अधिक सुरक्षित, पौष्टिक आणि स्वच्छ वातावरणात मिळावा यासाठी प्राथमिक शिक्षण संचालनालयाने सर्व संबंधित यंत्रणांना कडक सूचना जारी केल्या आहेत. शिक्षण संचालक यांच्या स्वाक्षरीने हे परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.

या योजनेअंतर्गत इयत्ता १ ली ते ५ वी च्या विद्यार्थ्यांना रोज ४५० उष्मांक (Calories) व १२ ग्रॅम प्रथिने (Protein) आणि इयत्ता ६ वी ते ८ वी च्या विद्यार्थ्यांना ७०० उष्मांक व २० ग्रॅम प्रथिनेयुक्त आहार दिला जातो. यासाठी केंद्र सरकारकडून भारतीय अन्न महामंडळामार्फत (FCI) सवलतीच्या दरात प्रति विद्यार्थी अनुक्रमे १०० ग्रॅम आणि १५० ग्रॅम तांदूळ पुरवला जातो.

१० मार्गदर्शक तत्वे

शाळांमध्ये या आहाराची गुणवत्ता आणि स्वच्छता राखण्यासाठी शिक्षण विभागाने १० प्रमुख मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.

स्वच्छता व बैठक व्यवस्था – स्वयंपाकगृह, भांडी व पिण्याच्या पाण्याची टाकी पूर्णपणे स्वच्छ असावी. स्वयंपाकी-मदतनीसांनी ॲप्रन, टोपी वापरणे व हात धुणे बंधनकारक आहे. विद्यार्थ्यांना माती किंवा मैदानात बसवून आहार न देता, व्हरांडा किंवा बस्करपट्टीवर स्वच्छ ठिकाणी बसवावे.

आहार गुणवत्ता व पिण्याचे पाणी – जिल्हानिहाय ठरवून दिलेल्या पाककृतीनुसारच आहार शिजवावा. पुरवठेदाराकडून आलेला तांदूळ व धान्य दर्जा आणि वजनाची खात्री करूनच स्वीकारावे. तसेच पिण्याच्या पाण्याच्या टाक्या नियमित स्वच्छ कराव्यात.

जंक फूड नकोच

शाळेच्या आवारापासून ५० मीटर परिसरात जास्त चरबी, साखर व मिठाचे प्रमाण असलेले (HFSS) आणि प्रतिबंधित जंक फूड विकण्यावर पूर्ण बंदी राहील. याबाबत शाळेच्या दर्शनी भागात माहिती फलक लावणे अनिवार्य आहे. माता-पालकांकडून चव चाचणी घ्यावी. विद्यार्थ्यांना आहार देण्यापूर्वी दररोज माता-पालकांना बोलावून आहाराची चव घ्यावी व त्यांच्या प्रतिक्रिया ‘चव नोंद रजिस्टर’मध्ये नोंदवाव्यात.

सुरक्षा फलक व तपासणी

अन्न सुरक्षा व मानके नियमांनुसार शाळेच्या आवारात अन्न सुरक्षा फलक लावावा. जिल्हा व तालुकास्तरीय भरारी पथकांनी शाळांना अचानक भेटी देऊन आहाराच्या गुणवत्तेची व स्वच्छतेची तपासणी करावी.
अद्ययावत नोंदी व जबाबदारी – दैनंदिन उपस्थिती आणि प्रत्यक्ष आहार घेतलेल्या विद्यार्थ्यांची नोंद ‘एमडीएम’ (MDM) पोर्टलवर करणे आवश्यक आहे. साठा, खर्च व धान्याचे लेखे अद्ययावत ठेवावेत. दैनंदिन आहाराची गुणवत्ता तपासण्याची मुख्य जबाबदारी मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापन समितीची (SMC) असेल.
तालुकास्तरीय पर्यवेक्षीय यंत्रणा, केंद्रप्रमुख आणि मुख्याध्यापकांनी या सर्व सूचनांचे तंतोतंत पालन करावे, असे निर्देश शिक्षण विभागाने दिले आहेत.