वर्धा : अन्न व औषधी प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सुरू केलेली स्वच्छता मोहीम चांगलीच गाजत आहे. त्यांचा प्रत्येक कानाकोपऱ्यात फिरत असलेला झाडू वाद पण निर्माण करू लागला आहे. पण शालेय पोषण आहार आणि या विभागाचे पत्रक यामुळे शिक्षक, मुख्याध्यापक संघटना संतप्त झाल्या आहेत. आमची जबाबदारी मुलांना खाऊ घालण्याची आहे. त्यासाठी परवाना घ्यायला सांगणे म्हणजे आता शिक्षक नव्हे तर दुकानदाराची भूमिका स्वीकारणे. हे मान्य करणार नाही, असा पवित्रा शिक्षक वर्तुळाने घेतला आहे.

परवाना घेणे अनिवार्य

FSSAI (अन्न सुरक्षा आणि मानके कायदा, २००६) अंतर्गत मुख्याध्यापकांना शालेय पोषण आहारा अंतर्गत परवाना/नोंदणी घेण्यास भाग ठरेल. तसे झाल्यास व्यावहारिक परिणाम होऊ शकतात, असा सूर उमटत आहे.

FSSAI कायद्यानुसार, एकदा का मुख्याध्यापकाने शाळेच्या नावे ‘Food Business Operator’ (FBO) म्हणजेच ‘खाद्य व्यावसायिक’ म्हणून नोंदणी केली किंवा परवाना घेतला, की कायदेशीररित्या ते अन्न शिजवण्यापासून ते वितरणापर्यंतच्या संपूर्ण साखळीचे मुख्य प्रमुख बनतात. यामुळे भविष्यात त्यांच्यावर कायदेशीर टांगती तलवार राहील.

थेट जबाबदारी पडणार

फौजदारी आणि दिवाणी गुन्ह्यांची थेट जबाबदारी (वैयक्तिक दायित्व) येऊन पडणार. FSSAI कायद्याच्या कलम ६६ नुसार, जर एखाद्या संस्थेकडून गुन्हा घडला, तर त्या संस्थेचा जो प्रभारी किंवा मुख्य व्यक्ती असेल, तो दोषी धरला जातो. त्याचे परिणाम – अन्नातून विषबाधा (Food Poisoning) झाल्यास किंवा अन्नाचा दर्जा निकृष्ट आढळल्यास, पोलिस आणि अन्न सुरक्षा अधिकारी (FSO) थेट मुख्याध्यापकांवर गुन्हा दाखल करू शकतात. “माल शासनाने पुरवला” हा बचाव कायद्याच्या कोर्टात टिकणे कठीण होते, कारण परवाना मुख्याध्यापकांच्या नावे असतो.

आर्थिक दंड आणि तुरुंगवास

FSSAI कायद्यात अन्न सुरक्षेच्या उल्लंघनासाठी अत्यंत कडक दंडाच्या तरतुदी आहेत. कलम ५१ (निकृष्ट दर्जाचे अन्न – Sub-standard Food) – ५ लाख रुपयांपर्यंत दंड. कलम ५२ (चुकीची माहिती/दिशाभूल – Misbranded Food) – ३ लाख रुपयांपर्यंत दंड. कलम ५९ (असुरक्षित अन्न ) – जर अन्नामुळे किरकोळ दुखापत झाली तर १ लाख दंड आणि ६ महिने तुरुंगवास, आणि गंभीर दुखापत किंवा मृत्यू झाल्यास ५ ते १० लाख रुपये दंड आणि ७ वर्षे ते आजन्म कारावासाची तरतूद आहे.

परिणाम – एका शासकीय शिक्षकाचे किंवा मुख्याध्यापकाचे वेतन या दंडाच्या रकमेपेक्षा खूप कमी असते. या नियमांमुळे मुख्याध्यापक आर्थिक आणि मानसिकदृष्ट्या उद्ध्वस्त होऊ शकतात.

‘RTI’ कार्यकर्ते आणि छळवणूक

शासकीय शाळा या सार्वजनिक असतात. तिथे कोणीही तपासणी करू शकते. परिणाम – माहिती अधिकार (RTI) कार्यकर्ते किंवा स्थानिक हितसंबंधी लोक FSSAI च्या क्लिष्ट नियमांचा (उदा. स्वयंपाकघराची स्वच्छता, पाण्याचा दर्जा रिपोर्ट, कर्मचाऱ्यांचे मेडिकल सर्टिफिकेट) आधार घेऊन मुख्याध्यापकांना ब्लॅकमेल करू शकतात. अन्न सुरक्षा अधिकारी (FSO) कधीही येऊन नमुने घेऊ शकतात आणि त्रुटी काढून निलंबनाची कारवाई सुचवू शकतात.

मुख्याध्यापक ‘असे’ अडकतील कैचीत

उदाहरण १ – निकृष्ट धान्य पुरवठा आणि ‘कलम ५१’ चा फास

परिस्थिती: शासनाच्या कंत्राटदाराने शाळेला पांढरा वाटाणा आणि तांदूळ पुरवला. हा माल आधीच गोदामात राहून दमट झाला होता आणि त्याला बुरशी लागली होती. ठेकेदाराच्या भीतीने किंवा पर्याय नसल्याने शाळेने तो स्वीकारला. एखाद्या त्रयस्थ व्यक्तीने किंवा अधिकाऱ्याने शाळेत येऊन या अन्नाचे सॅम्पल घेतले आणि ते लॅबमध्ये फेल झाले. FSSAI नुसार मुख्याध्यापक ‘FBO’ असल्याने, लॅब रिपोर्टच्या आधारे मुख्याध्यापकांवर ‘निकृष्ट अन्न साठवणे’ या अंतर्गत ‘कलम ५१’ नुसार ३ ते ५ लाखांच्या दंडाची कायदेशीर नोटीस येईल. कंत्राटदार मात्र “आम्ही चांगलाच माल दिला होता, शाळेत साठवणूक नीट झाली नाही” असे सांगून हात झटकून मोकळा होईल.

उदाहरण २ – पाणी किंवा स्वयंपाकी यांच्यामुळे झालेली विषबाधा – शाळेतील छतावरील टाकी अनेक दिवसांत साफ झालेली नाही किंवा पोषण आहार शिजवणाऱ्या महिला कर्मचाऱ्याला नखांचा किंवा त्वचेचा संसर्ग (Infection) आहे. नकळत त्यातून अन्नात जिवाणू संसर्ग झाला आणि १०-१२ मुलांना उलट्या-जुलाब (विषबाधा) झाले. अशा वेळी FSSAI चे अधिकारी तपासणी करतील. FSSAI च्या शेड्युल ४ नुसार ‘पाण्याचा वार्षिक चाचणी अहवाल’ आणि ‘कर्मचाऱ्यांचे आरोग्य प्रमाणपत्र’ असणे अनिवार्य आहे. शाळांकडे यासाठी निधी नसल्याने हे कागदपत्र नसतात. परिणामी, ‘कलम ५९’ (असुरक्षित अन्न) अन्वये मुख्याध्यापकांवर थेट फौजदारी गुन्हा (F.I.R.) दाखल होऊन त्यांना अटक होऊ शकते.

उदाहरण ३: कंत्राटदारांची माघार : कडक नियमांमुळे आणि कॉलिटी धान्य पुरवावे लागत असल्यामुळे कंत्राटदाराने नफा मिळत नसल्याचे सांगून कंत्राट सोडले. प्रशासनाने तोंडी आदेश देऊन मुख्याध्यापकांनाच स्थानिक पातळीवर धान्य खरेदी करण्यास सांगितले.

परिणाम – मुख्याध्यापक बाजारातून धान्य खरेदी करतील. पण बाजारातील धान्याला ‘FSSAI बॅच नंबर’ किंवा ‘अॅगमार्क’ (Agmark) नसेल, तर केवळ ‘विना परवाना किंवा विना लेबल असलेले अन्न पुरवणे’ या तांत्रिक कारणावरून मुख्याध्यापकांना दोषी ठरवून प्रशासकीय चौकशी लावली जाऊ शकते.

शिक्षक आहोत, व्यापारी नाही

FSSAI कायदा हा ‘व्यापाऱ्यांसाठी’ बनवला गेला आहे, ‘शिक्षकांसाठी’ नाही. जर मुख्याध्यापकांना सक्तीने हे परवाने काढायला लावले, तर भविष्यात ते वर्गात शिकवण्यापेक्षा कोर्ट-कचेऱ्या आणि अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांच्या नोटिसींना उत्तरे देण्यातच व्यस्त राहतील, असे मत व्यक्त होत आहे. संघटनांनी कोर्टात किंवा शासनाकडे दाद मागताना हाच मुद्दा लावून धरला पाहिजे की, आम्ही केवळ शासनाच्या योजनेचे अंमलबजावणी अधिकारी आहोत, व्यावसायिक नाही. त्यामुळे मूळ परवाना शिक्षण विभाग किंवा जिल्हा प्रशासनाच्या नावे असावा, मुख्याध्यापकांच्या वैयक्तिक नावे नाही, अशी भावना आहे.

शिक्षक नेते म्हणतात

मुख्याध्यापक संघटनेचे प्रदेश नेते सतीश जगताप हे सांगतात की पंतप्रधान पोषण शक्ती निर्माण योजना म्हणजेच शालेय आहार याबाबत शाळांना अन्न व औषध प्रशासनाने परवाना काढण्याचे निर्देश दिले आहेत. मुख्य जबाबदारी मुख्याध्यापकवर राहणार आहे. परवाना म्हटला की नियम आलेच.त्याबाबत काय याचा त्वरित खुलासा अपेक्षित असल्याचे जगताप म्हणतात. मुख्याध्यापक हे खाद्यपदार्थ व्यावसायिक नाही. कुठला व्यवहार किंवा नफा- तोटा नाही. फक्त विद्यार्थी हिताच्या सेवा देत असतात. त्यांना इतर व्यवसायीकांप्रमाणे नियम न लावता, संबंधित विभाग ने मुख्याध्यापक व शाळांकरिता अनुकूल वेगळी नियमावली तयार करावी, असे मत प्रदेश पदाधिकारी डॉ. संजय भांडारकर हे व्यक्त करतात.