नागपूर : राज्याचे वरिष्ठ आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी ‘मी आयएएसमधून निवृत्त होईन, पण सार्वजनिक सेवेतून कधीही निवृत्त होणार नाही’ असे स्पष्ट विधान करताच त्यांच्या भविष्यातील भूमिकेबाबत राजकीय, सामाजिक आणि प्रशासकीय वर्तुळात चर्चांना वेग आला आहे.
सार्वजनिक सेवेची भूमिका कायम ठेवण्याचा निर्धार
‘प्रवाहाच्या विरुद्ध जाणारा माणूस मूर्ख नसतो, तर तो धैर्यवान असतो. मी आयएएसमधून निवृत्त होईन, पण सार्वजनिक सेवेतून कधीही निवृत्त होणार नाही,’ असे परखड प्रतिपादन राज्याचे वरिष्ठ सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांनी केले. त्यांच्या या विधानामुळे राज्यातील राजकीय, सामाजिक आणि प्रशासकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. शासकीय सेवेनंतरही समाजासाठी कार्यरत राहण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केल्याने त्यांच्या पुढील वाटचालीबाबत उत्सुकता वाढली आहे.
सोशल मीडियावरील पोस्टने वाढविले तर्कवितर्क
मुंढे यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम खात्यावर ‘इफ आय कॅन नोट, हू एल्स कॅन? #लिडरशीप’ असा संदेश पोस्ट केला आहे. या पोस्टनंतर त्यांच्या भविष्यातील भूमिकेबाबत सोशल मीडियावर विविध तर्कवितर्क सुरू झाले आहेत. ‘सार्वजनिक सेवेतून कधीही निवृत्त होणार नाही’ या विधानाची जोड या पोस्टशी लावत अनेकांनी त्यांच्या पुढील निर्णयांबाबत चर्चा सुरू केली आहे. काहींनी हे सामाजिक क्षेत्रातील सक्रिय भूमिकेचे संकेत मानले असून, तर काहींनी भविष्यातील राजकीय शक्यतांवरही भाष्य केले आहे. मात्र, मुंढे यांनी यासंदर्भात कोणतीही अधिकृत भूमिका स्पष्ट केलेली नाही.
प्रशासकीय कारकिर्दीनंतरच्या नव्या इनिंगची चर्चा
तुकाराम मुंढे हे कठोर, शिस्तप्रिय आणि नियमांच्या काटेकोर अंमलबजावणीसाठी ओळखले जातात. विविध पदांवरील त्यांच्या वारंवार झालेल्या बदल्यांमुळे ते नेहमीच चर्चेत राहिले आहेत. अशा पार्श्वभूमीवर त्यांनी सार्वजनिक सेवेत कायम सक्रिय राहण्याची व्यक्त केलेली भूमिका लक्षवेधी मानली जात आहे. शासकीय सेवेनंतर ते थेट जनतेमध्ये काम करणार का, सामाजिक चळवळीचे नेतृत्व स्वीकारणार का किंवा अन्य कोणत्या माध्यमातून सार्वजनिक जीवनात सक्रिय राहणार, याबाबत राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चा रंगू लागल्या आहेत. साताऱ्यासह राज्यभरात त्यांच्या पुढील वाटचालीबाबत उत्सुकता व्यक्त केली जात आहे.
भेसळविरोधी मोहिमेमुळे पुन्हा चर्चेत
सध्या राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागात कार्यरत असलेले मुंढे यांनी भेसळयुक्त अन्नपदार्थ आणि बनावट औषधांविरोधात व्यापक मोहीम हाती घेतली आहे. राज्यभर धडक तपासण्या, कठोर कारवाया आणि नियमांची प्रभावी अंमलबजावणी यामुळे अनेक व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. या मोहिमेमुळे आणखी मोठ्या गैरव्यवहारांचा पर्दाफाश होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, राज्य सरकारने त्यांच्याकडील पालक सचिवपदाची जबाबदारी काढून घेतल्याने प्रशासकीय वर्तुळातही विविध चर्चांना उधाण आले आहे. त्यांच्या कठोर कार्यशैलीमुळे काही हितसंबंधी नाराज असल्याची चर्चा असली, तरी या संदर्भात सरकारकडून कोणतीही अधिकृत भूमिका जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे मुंढे यांची भेसळविरोधी मोहीम आणि त्यांच्या भविष्यातील सार्वजनिक भूमिकेबाबतची उत्सुकता कायम आहे.
