नागपूर : राज्याचे वरिष्ठ सनदी अधिकारी तुकाराम मुंढे सध्या आपल्या एका वक्तव्याने सर्वत्र चर्चेत आहेत. शासकीय सेवेच्या निवृत्तीनंतर त्यांनी सार्वजनिक जीवनात उतरण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे मुंडे राजकारणात जाणार का अशा चर्चा रंगत असतानाच थेट तुकाराम मुंढेंनी आता नागपूरच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जवळ असलेल्या रेशीमबाग येथील एका सभागृहात एक भव्य कार्यक्रम घेणार आहे. काय आहे संपूर्ण नियोजन पाहूया…

काय असेल कार्यक्रमात

तुकाराम मुंढे हे महाराष्ट्रातील सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या अधिकाऱ्यांपैकी एक मानले जातात. त्यांच्या प्रशासकीय कारकिर्दीत अनेक धाडसी निर्णय, वादग्रस्त घडामोडी आणि जनहिताच्या भूमिका पाहायला मिळाल्या. त्यामुळे तुकाराम मुंढे यांच्यावरील पुस्तक प्रकाशित होत असल्याने त्याची चर्चा सुरू झाली आहे. पुस्तकार मुंढे यांच्या बालपणापासून ते प्रशासकीय सेवेतल्या महत्त्वाच्या टप्प्यांपर्यंतचा प्रवास, संघर्ष, बदलींची मालिका, विविध पदांवरील अनुभव आणि जनतेशी जोडलेली त्यांची प्रतिमा यावर प्रकाश टाकला जाण्याची अपेक्षा आहे.

काय नियोजन आहे?

स्टुडेंट्स राईट्स असोसिएशन ऑफ इंडिया आणि स्टुडेंट्स राईट्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘युवकांशी संवाद’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम रविवार, २ ऑगस्टला सायंकाळी ५ वाजता रेशीमबाग येथील महाकवी सुरेश भट सभागृहात होणार असल्याची माहिती, संस्थेचे अध्यक्ष उमेश कोर्राम यांनी पत्रकार परिषदेत दिली. कार्यक्रमात अन्न व औषध प्रशासन आयुक्त तथा नागपूर महापालिकेचे माजी आयुक्त तुकाराम मुंढे युवकांशी संवाद साधणार आहेत. प्रशासनातील अनुभव, सुशासन, युवकांची सामाजिक जबाबदारी तसेच देशाच्या विकासातील त्यांच्या भूमिकेवर ते मार्गदर्शन करणार असल्याचे कोर्राम यांनी सांगितले. युवकांना सकारात्मक दिशा देणे, सामाजिक जाणिवा अधिक दृढ करणे आणि राष्ट्रनिर्मितीतील त्यांच्या भूमिकेविषयी संवाद घडवून आणणे हा कार्यक्रमाचा उद्देश आहे. पत्रकार परिषदेला आकाश वैद्य, विनीत गजभिये, आयुर्वेद सेलुकर, शुभम तिखट, मनोज वानखेडे, रोहन आडेवार, देवेंद्र समर्थ, मनीष गिरडकर आणि प्रतीक बावणकर उपस्थित होते.

राजकीय चर्चा रंगल्या

तुकाराम मुंढे हे कठोर, शिस्तप्रिय आणि नियमांच्या काटेकोर अंमलबजावणीसाठी ओळखले जातात. विविध पदांवरील त्यांच्या वारंवार झालेल्या बदल्यांमुळे ते नेहमीच चर्चेत राहिले आहेत. अशा पार्श्वभूमीवर त्यांनी सार्वजनिक सेवेत कायम सक्रिय राहण्याची व्यक्त केलेली भूमिका लक्षवेधी मानली जात आहे. शासकीय सेवेनंतर ते थेट जनतेमध्ये काम करणार का, सामाजिक चळवळीचे नेतृत्व स्वीकारणार का किंवा अन्य कोणत्या माध्यमातून सार्वजनिक जीवनात सक्रिय राहणार, याबाबत राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चा रंगू लागल्या आहेत. साताऱ्यासह राज्यभरात त्यांच्या पुढील वाटचालीबाबत उत्सुकता व्यक्त केली जात आहे.