नागपूर : २०२०, जून महिन्याच्या २० तारखेला सुरेश भट सभागृहात महापालिकेची सभा आयोजित करण्यात आली होती. कोरोना काळामुळे सामाजिक अंतराच्या नियमामुळे या सभागृहात सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेवर तत्कालीन महापौर संदीप जोशी व सत्ताधारी व तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यातील वादाचे सावट होते. तत्पूर्वी महापौर व आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यात कधी फोन उचलत नाही तर कधी मेसेजला रिप्लाय देत नाही, यावरून वाद रंगला होता. यावरून २० जून २०२० रोजी झालेल्या सुरेश भट सभागृहात सभेत तुकाराम मुंढे यांच्यावर सत्ताधाऱ्यांकडून आरोपांच्या फैरी झाडण्यात आल्या. आता याच सभागृहात अन्न व औषध प्रशासनानेचे आयुक्त आयुक्त तुकाराम मुंढे विद्यार्थ्यांसोबत संवाद साधणार असल्याने ते काय बोलणार याकडे लक्ष लागले आहे.
सुरेश भट सभागृहातून तावातावात का निघून गेले होते मुंढे?
२० जून २०२० रोजी झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत केटीनगर परिसरातील जागेवरील कोव्हिड-९ हॉस्टिपलसाठी आयुक्तांनी आरक्षण का हटवले, यावरून भाजपचे नगरसेवक दयाशंकर तिवारी यांनी पाँईट आफ इन्फर्मेशन अंतर्गत मुद्दा उपस्थित केला. दयाशंकर तिवारी यांनी तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडल्या. यावरून संतप्त होत तुकाराम मुंढे रागारागाने सभागृहातून निघून गेले होते. त्यानंतर तुकाराम मुंढे यांनी या घटनेवर स्पष्टीकरणही दिले. “मी सभेतून निघून नाही गेलो, तर सभात्याग केला. सभेदरम्यान स्थानिक प्रश्न सोडवण्याबद्दल अधिकारी उत्तर देत असताना कुणी ऐकेना. मग मी उत्तर द्यायला सुरुवात केली असताना नगरसेवक दयाशंकर तिवारी यांनी उठून ‘पाँइंट ऑफ इन्फर्मेशन’चा मुद्दा काढला आणि चढ्या आवाजात बोलायला सुरुवात केली. त्यामुळे मग मी महापौरांनी म्हटले की, हे असंच सुरू राहिले, तर मी सभेत राहणार नाही. त्यानंतर परत दुसरे नगरसेवक बोलायला लागले. परत वैयक्तिक टीका करू लागले, तुमचे नाव तुकाराम आहे, तुकाराम संत होते, तुम्ही त्या नावाला कलंक आहात. त्यानंतर मात्र मी सभात्याग केला”, असे तुकाराम मुंढे म्हणाले होते.
काय होता वाद?
२०२० मध्ये महापालिकेच्या स्थायी समितीने जवळपास 3100 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला होता. तर तुकाराम मुंडेंनी जवळपास 2500 कोटी रुपयांचे बजेट तयार केले होते. जी कामे गरजेची आहेत तीच प्राधान्याने करावीत, असे तुकाराम मुंढेंचे मत होते. त्यामुळे मग या दोन्ही बजेटमध्ये जवळपास ६०० कोटी रुपयांचा फरक राहिला. पण, मग महापालिकेच्या स्थायी समितीने मंजूर केलेली अनेक कामे यामुळे लांबणीवर पडली. इथूनच मुंढे आणि महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांमधील वादास सुरुवात झाली. त्यानंतर हा वाद स्मार्ट सिटीच्या सीईओ म्हणून मुंढे यांनी घेतलेल्या निर्णयापर्यंत पोहोचला. यात तत्कालीन महापौर संदीप जोशी यांनी पोलिसांकडे तक्रार केली होती. मागील वर्षी डिसेंबरमध्ये तुकाराम मुंढे यांना या प्रकरणातून क्लिन चिट मिळाली.
नागपुरात कुणी केले संवादाचे आयोजन?
स्टुडेंट्स राईट्स असोसिएशन ऑफ इंडिया आणि स्टुडेंट्स राईट्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘युवकांशी संवाद’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम रविवार, २ ऑगस्टला सायंकाळी ५ वाजता रेशीमबाग येथील महाकवी सुरेश भट सभागृहात होणार असल्याची माहिती, संस्थेचे अध्यक्ष उमेश कोर्राम यांनी दिली. प्रशासनातील अनुभव, सुशासन, युवकांची सामाजिक जबाबदारी तसेच देशाच्या विकासातील त्यांच्या भूमिकेवर ते मार्गदर्शन करणार असल्याचे कोर्राम यांनी सांगितले. युवकांना सकारात्मक दिशा देणे, सामाजिक जाणिवा अधिक दृढ करणे आणि राष्ट्रनिर्मितीतील त्यांच्या भूमिकेविषयी संवाद घडवून आणणे हा कार्यक्रमाचा उद्देश आहे.
