नागपूर : नागपूरच्या खाद्यसंस्कृतीची ओळख असलेल्या सावजी मटणावर अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केलेल्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला आहे. “माझ्यासारख्या माणसाने सावजी जेवण खाल्ले तर किमान महिनाभर रुग्णालयात जावे लागेल”, असे वक्तव्य करत त्यांनी तेलकट व तिखट अन्नपदार्थांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला होता. या विधानामुळे सावजी हॉटेल व्यावसायिक, सावजी समाज आणि खाद्यप्रेमींमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून, मुंढे यांनी माफी मागावी, अन्यथा मानहानीचा दावा दाखल करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
नागपुरात हजारांहून अधिक सावजी भोजनालये
नागपूरमध्ये सुमारे एक हजारांहून अधिक सावजी भोजनालये असून, हा केवळ खाद्यपदार्थ नसून शहराच्या सांस्कृतिक ओळखीचा भाग असल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे. “सावजी आरोग्यासाठी इतकेच घातक असते, तर नागपूरमधील सर्व रुग्णालये रुग्णांनी भरली असती. सावजी हा आमचा ब्रँड आहे आणि अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह त्यावर अवलंबून आहे,” अशी प्रतिक्रिया एका व्यावसायिकाने दिली. काही व्यावसायिकांनी मुंढे यांना मूळ सावजी पदार्थाची चव घेण्याचे निमंत्रणही दिले. “ते आमच्या घरी येऊन सावजी खावेत किंवा आम्ही त्यांच्या घरी जाऊन पारंपरिक पद्धतीने सावजी बनवून दाखवू. प्रत्यक्ष अनुभव घेतल्यानंतरच मत व्यक्त करावे,” असेही त्यांनी म्हटले.
माफी मागा, अन्यथा मानहानीचा दावा
सावजी समाजाच्या प्रतिनिधींनी मुंढे यांच्या वक्तव्यामुळे सावजी ब्रँडची प्रतिमा मलिन झाल्याचा आरोप केला आहे. पिढ्यान् पिढ्या हा व्यवसाय करणाऱ्या कुटुंबांच्या उपजीविकेवर अशा विधानांचा परिणाम होऊ शकतो, असे सांगत त्यांनी सार्वजनिक माफीची मागणी केली आहे. माफी न मागितल्यास न्यायालयात मानहानीचा दावा दाखल करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. या वादात दुसरी बाजूही पुढे आली आहे. सावजीच्या नावाखाली अनेक ठिकाणी अत्यधिक तेल आणि तिखट वापरून पदार्थ तयार केले जात असल्याचे मान्य केले जात आहे. त्यामुळे काही ग्राहकांना आरोग्याच्या तक्रारी जाणवतात. मात्र, ही पारंपरिक सावजी पाककृती नसून चुकीच्या पद्धतीने तयार होणाऱ्या पदार्थांमुळे संपूर्ण सावजी खाद्यसंस्कृतीला दोष देणे योग्य नसल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे.
मसाले पचनास मदत करणारे, पण…
आहारतज्ञांच्या मते, सावजी मसाल्यात वापरले जाणारे बहुतांश मसाले पौष्टिक आणि पचनास मदत करणारे आहेत. मात्र, अनेक ठिकाणी तेलाचे प्रमाण जास्त ठेवले जाते. त्यामुळे पारंपरिक चव कायम ठेवत तेलाचे प्रमाण नियंत्रित करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. सावजी खाद्यसंस्कृतीची मुळे मध्य भारतातील हलबा-कोष्टी समाजाच्या पारंपरिक स्वयंपाकात आहेत. सुकी लाल मिरची, धणे, जिरे, काळी मिरी, लवंग, दालचिनी, तमालपत्र, खसखस, सुके खोबरे, कांदा आणि लसूण यांचा विशिष्ट पद्धतीने भाजून तयार केलेला मसाला ही सावजीची खरी ओळख आहे. या मसाल्यामुळे रस्सा काळपट रंगाचा आणि वैशिष्ट्यपूर्ण चवीचा होतो.
सावजी मसाल्यात शाकाहारी पदार्थही
सावजी मसाल्यात मटण, चिकन, खिमा, कलेजी, खूर यांसारखे मांसाहारी पदार्थ तर मसाला वांगे, डाळ-कांदा, गवार, पाटोळी आणि तर्री पोहे यांसारखे शाकाहारी पदार्थही तयार केले जातात. नागपूरच्या खाद्यसंस्कृतीत सावजीला विशेष स्थान असून, स्थानिकांसह देशभरातील अनेक खाद्यप्रेमी आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांचीही ती पसंती आहे.
