नागपूर : अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सावजी जेवणाबाबत केलेल्या वक्तव्यावरून आता सामाजिक आणि राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या युवा आघाडीने मुंढे यांच्या वक्तव्याचा निषेध करत ते तातडीने मागे घ्यावे आणि विदर्भातील जनतेची जाहीर माफी मागावी, अशी मागणी केली आहे.
विदर्भ राज्य आंदोलन समितीने नेमकी भूमिका काय मांडली?
समितीचे युवा आघाडीचे प्रांताध्यक्ष मुकेश मासुरकर यांनी प्रसिद्धीपत्रकातून तुकाराम मुंढे यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध केला आहे. सावजी जेवण ही केवळ खाद्यपद्धती नसून नागपूर आणि संपूर्ण विदर्भाच्या सांस्कृतिक परंपरेचा, खाद्यसंस्कृतीचा आणि अस्मितेचा अविभाज्य भाग असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे अशा परंपरेबाबत अवमानकारक किंवा सर्वसाधारण स्वरूपाची विधाने करणे दुर्दैवी असल्याचे त्यांनी नमूद केले.
कोल्हापूरचा संदर्भ देत त्यांनी काय म्हटले?
मुकेश मासुरकर म्हणाले, कोल्हापूरमधील नागरिकही अतितिखट खाद्यपदार्थ खातात. ते अनेकदा सावजी जेवणापेक्षाही अधिक तिखट मानले जातात. मग त्यांना हृदयविकाराचा झटका का येत नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. एखाद्या व्यक्तीचा वैयक्तिक अनुभव संपूर्ण खाद्यसंस्कृतीवर लादणे योग्य नसल्याचेही त्यांनी म्हटले.
सार्वजनिक पदावरील व्यक्तींना काय आवाहन करण्यात आले?
सार्वजनिक जीवनातील व्यक्तींनी कोणत्याही प्रदेशाची संस्कृती, परंपरा आणि स्थानिक भावनांचा आदर राखून वक्तव्य करावे, असे आवाहन समितीने केले आहे. मतभेद व्यक्त करण्याचा प्रत्येकाला अधिकार असला, तरी त्यातून एखाद्या प्रदेशाच्या अस्मितेचा अवमान होणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक असल्याचे मासुरकर यांनी म्हटले.
समितीची मागणी काय आहे?
तुकाराम मुंढे यांनी सावजीबाबत केलेले वक्तव्य तातडीने मागे घ्यावे आणि विदर्भातील जनतेची जाहीर माफी मागावी, अशी मागणी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या युवा आघाडीने केली आहे.
वादाची पार्श्वभूमी काय?
एका कार्यक्रमातील ‘मी सावजी खाल्ला तर एक महिना आजारी पडेन’ या तुकाराम मुंढे यांच्या वक्तव्याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर त्यावर विविध स्तरांतून प्रतिक्रिया उमटत आहेत. हलबा-कोष्टी समाज, सावजी भोजनालय चालक, खाद्यप्रेमी आणि विविध संघटनांनी सावजी ही विदर्भाच्या खाद्यसंस्कृतीची ओळख असल्याचे सांगत या वक्तव्यावर आक्षेप नोंदवला आहे. समाजमाध्यमांवरही मुंढे यांच्या वक्तव्याविरोधात मोठ्या प्रमाणावर पोस्ट आणि प्रतिक्रिया प्रसारित होत आहेत.
