नागपूर: दिल्लीच्या जंतर-मंतर येथे झालेल्या कॉक्रोज जनता पार्टीच्या आंदोलनानंतर देशातील जेन-झी अधिक चर्चेत आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी नवनवीन व्हिडीओ तयार करून आपला संदेश त्यांना देत आहेत. अशातच महाराष्ट्रातील वरिष्ठ सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांनी नागपूरमधील एका कार्यक्रमात जेन-झी बद्दल महत्त्वाचे वक्तव्य करत त्यांच्याकडून फार मोठी अपेक्षा व्यक्त केले.

झुंडशाहीविरोधात उभे रहा

समाजाचा प्रत्येक प्रवाह किंवा बहुसंख्यांचा निर्णय योग्यच असेल असे नाही. समाजहित आणि नैतिकतेच्या विरोधात जाणाऱ्या प्रवृत्तींना विरोध करण्याचे धैर्य प्रत्येकामध्ये असले पाहिजे. झुंडशाहीविरोधात संघर्ष करण्याची क्षमता आणि विवेक जोपासणे ही काळाची गरज असून ही जबाबदारी आता नवीन पिढीने स्वीकारली पाहिजे, असे प्रतिपादन राज्याचे वरिष्ठ सनदी अधिकारी तथा अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले.

आजच्या काळात विचारांचे युद्ध

आजच्या काळात शस्त्रांचे नव्हे, तर विचारांचे युद्ध सुरू असल्याचे नमूद करत मुंढे यांनी समाजमाध्यमांद्वारे चुकीची माहिती पसरवून समाजात फूट पाडण्याचे प्रयत्न होत असल्याचा इशारा दिला. प्रवाहाबरोबर वाहत जाण्यापेक्षा योग्य दिशेची निवड करण्याची क्षमता विकसित करणे, हीच आजच्या शिक्षणाची खरी कसोटी आहे. समाजाचा प्रवाह चुकीचा वाटत असेल, तर त्याविरोधात उभे राहण्याची मानसिक तयारी आणि नैतिक धैर्य व्यक्तीमध्ये असले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

ॲडॉल्फ हिटलरच्या काळातील कायद्यांनुसार काही निर्णय योग्य मानले गेले असले, तरी मानवतेच्या आणि समाजहिताच्या कसोटीवर ते चुकीचे ठरले. त्यामुळे कोणताही आदेश किंवा व्यवस्था स्वीकारताना विवेकबुद्धीचा वापर करणे आवश्यक आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, ऑटोमेशन आणि बदलते तंत्रज्ञान रोजगाराचे स्वरूप वेगाने बदलत आहे. त्यामुळे पुढील चार-पाच वर्षांतील गरजा लक्षात घेऊन भविष्यात आवश्यक ठरणारी कौशल्ये आजपासूनच आत्मसात करण्याची तयारी विद्यार्थ्यांनी करावी, असे आवाहन मुंढे यांनी केले.

संदेशाचा स्रोत तपासण्याची सवय लावा

कोणताही संदेश, चित्रफीत किंवा रील मिळाल्यानंतर तो सत्य मानण्यापूर्वी त्याचा स्रोत, उद्देश आणि परिणाम तपासण्याची सवय विद्यार्थ्यांनी लावून घ्यावी, असे आवाहन मुंढे यांनी केले. समाजमाध्यमांवरील अल्गोरिदममुळे माणूस स्वतःच्या मतांशी जुळणारे विचारच अधिक पाहू लागतो आणि भिन्न विचार स्वीकारण्याची मानसिकता कमी होते. वाढत्या वैचारिक दरीमागे हेही एक महत्त्वाचे कारण असल्याचे त्यांनी नमूद केले.

एआय समाजहितासाठी वापरा

कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर समाजाच्या प्रगतीसाठी व्हावा. दिशाभूल करणाऱ्या चित्रफीत तयार करणे, अफवा पसरवणे किंवा समाजात तेढ निर्माण करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर होऊ नये. तंत्रज्ञानासोबत नैतिक जबाबदारीही तितकीच महत्त्वाची असल्याचे मुंढे यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.