नागपूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०४७ मध्ये भारताला महासत्ता बनवण्याचे स्वप्न पाहिले आहे. विकसित भारताची संकल्पनाही त्यांनी अनेकदा आपल्या भाषणातून जाहीर केली. मात्र, आपल्या रोखठोक वक्तव्यासाठी आणि प्रशासकीय कामासाठी प्रसिद्ध असलेले राज्याचे वरिष्ठ सनदी अधिकारी तथा अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी यावर आपले मत व्यक्त करताना एक महत्त्वाचा सल्ला दिला. त्यामुळे २०४७ च्या भारतावर मुंढेंची प्रतिक्रिया हा चर्चेचा विषय झाला आहे.

जेन-झीकडून व्यक्त केली ही अपेक्षा

समाजाचा प्रत्येक प्रवाह किंवा बहुसंख्यांचा निर्णय योग्यच असेल असे नाही. समाजहित आणि नैतिकतेच्या विरोधात जाणाऱ्या प्रवृत्तींना विरोध करण्याचे धैर्य प्रत्येकामध्ये असले पाहिजे. झुंडशाहीविरोधात संघर्ष करण्याची क्षमता आणि विवेक जोपासणे ही काळाची गरज असून ही जबाबदारी आता नवीन पिढीने स्वीकारली पाहिजे, असे तुकाराम मुंढे म्हणाले. स्मृतीशेष मधुकरराव तामगाडगे ट्रस्टच्या वतीने वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित शिष्यवृत्ती वितरण व करिअर मार्गदर्शन कार्यक्रमात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.

समाज माध्यमांच्या वापरावर दिल्ला सल्ला

आजच्या काळात शस्त्रांचे नव्हे, तर विचारांचे युद्ध सुरू असल्याचे नमूद करत मुंढे यांनी समाजमाध्यमांद्वारे चुकीची माहिती पसरवून समाजात फूट पाडण्याचे प्रयत्न होत असल्याचा इशारा दिला. प्रवाहाबरोबर वाहत जाण्यापेक्षा योग्य दिशेची निवड करण्याची क्षमता विकसित करणे, हीच आजच्या शिक्षणाची खरी कसोटी आहे. समाजाचा प्रवाह चुकीचा वाटत असेल, तर त्याविरोधात उभे राहण्याची मानसिक तयारी आणि नैतिक धैर्य व्यक्तीमध्ये असले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

२०४७ विषयी नेमके काय म्हणाले

भारताला २०४७ पर्यंत महासत्ता बनविण्याचे ध्येय गाठायचे असेल, तर केवळ आर्थिक प्रगती पुरेशी ठरणार नाही. समाज वैचारिकदृष्ट्या सक्षम आणि वैज्ञानिक दृष्टिकोन असलेला असणेही तितकेच आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. “पदवी महत्त्वाची असली तरी आजच्या काळात कौशल्य अधिक महत्त्वाचे आहे. आयुष्यभर शिकत राहण्याची वृत्तीच यशस्वी करिअरचा पाया ठरेल,” असे मुंढे म्हणाले. कोणताही संदेश, व्हिडीओ किंवा रील मिळाल्यानंतर तो सत्य मानण्यापूर्वी त्याचा स्रोत, उद्देश आणि परिणाम तपासण्याची सवय लावून घ्यावी, असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले. समाजमाध्यमांवरील अल्गोरिदम माणसाला त्याच्या आवडीच्या गोष्टीच वारंवार दाखवत असल्याने भिन्न विचार स्वीकारण्याची मानसिकता कमी होत चालल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.