नागपूर : करोनाकाळात सनदी अधिकारी तुकाराम मुंढे आणि भाजप नेते, तत्कालिन महापौर संदीप जोशी यांच्यातील संघर्षाने नागपूरच्या राजकारणात मोठी खळबळ उडवली होती. कठोर प्रशासन, लोकप्रतिनिधींचा विरोध आणि सोशल मीडियावरील तीव्र प्रतिक्रिया यामुळे हा वाद त्या काळापुरता मर्यादित न राहता दीर्घकाळ चर्चेत राहिला. मुंढे यांची नंतर बदली करण्यात आली. त्यांच्या २१ वर्षांच्या सेवेत झालेल्या २४व्या बदलीनंतर या प्रकरणाची पुन्हा आठवण झाली.
कठोर प्रशासनामुळे चर्चेत
करोनाच्या काळात तुकाराम मुंढे यांनी नागपूर महापालिकेचे आयुक्त म्हणून अत्यंत शिस्तबद्ध आणि कठोर पद्धतीने कारभार केला. लॉकडाऊनची काटेकोर अंमलबजावणी, क्वारंटाईन केंद्रांची उभारणी आणि संसर्ग नियंत्रणासाठी त्यांनी आक्रमक धोरणे राबवली. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली. त्यामुळे प्रशासनावर नियंत्रण आले, मात्र काही नागरिकांमध्ये नाराजीही निर्माण झाली. तरीही अनेकांनी त्यांच्या कार्यपद्धतीचे समर्थन केले.
मुंढे-जोशी वाद का उफाळला?
त्या काळात मुंढे आणि संदीप जोशी यांच्यातील मतभेद उघडपणे समोर आले. त्या वेळी महापौर असलेल्या जोशी यांनी प्रशासन लोकप्रतिनिधींना विश्वासात घेत नसल्याची टीका केली. निर्णय प्रक्रियेत त्यांना डावलले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. याउलट, मुंढे यांनी सर्व निर्णय नियमांनुसार आणि परिस्थितीनुसार घेत असल्याचे सांगत आपल्या भूमिकेचे समर्थन केले.
बैठकींपासून सोशल मीडियापर्यंत संघर्ष
कोविड उपाययोजनांवरून झालेल्या बैठकीतील वाद बाहेर आल्यानंतर हा संघर्ष अधिक तीव्र झाला. प्रशासनिक अधिकार आणि लोकशाही प्रतिनिधित्व यामधील संघर्ष स्पष्टपणे दिसू लागला. सोशल मीडियावरही या वादाची मोठी चर्चा झाली. काही गटांनी मुंढे यांच्या कठोर भूमिकेचे समर्थन केले, तर काहींनी जोशी यांच्या बाजूने भूमिका घेतली. फेसबुक आणि ट्विटरवर या विषयावर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया उमटल्या.
राजकीय वातावरण तापले
या सर्व घटनांमुळे नागपूरमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले. प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील दरी अधिकच वाढली. परिस्थिती हाताबाहेर जाण्याची चिन्हे दिसू लागल्यानंतर राज्य शासनाने हस्तक्षेप केला. प्रशासकीय पातळीवर बदल करण्यात आले, ज्यामुळे हा वाद काही प्रमाणात शांत झाला. मात्र त्याचे पडसाद दीर्घकाळ जाणवत राहिले.
निवडणूक परिणाम आणि पुनर्वसन
या पार्श्वभूमीवर झालेल्या नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत संदीप जोशी यांना पराभवाचा सामना करावा लागला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा प्रभाव असलेल्या या मतदारसंघातील हा निकाल धक्कादायक मानला गेला. स्थानिक नाराजी, सोशल मीडियावरील वातावरण आणि अंतर्गत राजकारण यांचा परिणाम या निकालावर झाल्याची चर्चा झाली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी जोशी यांना विधान परिषदेवर संधी देत त्यांचे राजकीय पुनर्वसन केले.
