नागपूर : अजनीतील रेल्वे मेन्स प्राथमिक आणि माध्यमिक शाळेसमोर असलेल्या धोकादायक वळणामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अजनी रेल्वे पुलावरून भरधाव येणारी वाहने अचानक वळण घेत असल्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांचाही जीव टांगणीला लागलेला असतो.
रेल्वे मेन्स मराठी एज्युकेशन सोसायटीची अजनी रेल्वे पुलासमोरच रेल्वे मेन्स प्राथमिक आणि माध्यमिक शाळा आहे. हजारावर मुले येथे शिक्षण घेतात. मात्र, या शाळेच्या प्रवेशद्वाराच्या अगदी १० फूट अंतरावरच मेडिकल चौकाकडे जाणारा मुख्य रस्ता आहे. रेल्वे मेन्स शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत जाण्यासाठी विद्यार्थ्यांना मुख्य रस्ता ओलांडावा लागतो. मेडिकलमध्ये जाणाऱ्या रुग्णवाहिकांचा ‘आवाज’ विद्यार्थ्यांच्या नेहमी कानावर पडतो. हा रस्ता चोवीस तास वाहता आहे. त्यातच शाळेसमोर धोकादायक वळण आहे. त्या वळणावर आतापर्यंत अनेक अपघात झाले आहेत.
आणखी वाचा-नागपूर: सिमेंटची परराज्यातील वाहनांवर मालवाहतूक केल्यास… ट्रान्सपोर्ट व्यवसायिक म्हणतात..
सकाळी शाळा भरायची वेळ आणि कार्यालयात जाण्यासाठी निघणाऱ्या चाकरमान्यांची वेळ सारखीच असल्यामुळे या रस्त्यावर मोठी गर्दी होते. त्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होतो. विद्यार्थ्यांना रस्ता ओलांडताना जीव मुठीत घेऊन जावे लागते. शिक्षक रस्त्यावर उभे राहून विद्यार्थ्यांना मदत करीत असले तरी वाहनांची वर्दळ इतकी अधिक असते की एखादवेळी भरधाव वाहन धडक देण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पदपथावर विक्रेत्यांचे अतिक्रमण
शाळेसमोरील पदपथावर पाणीपुरी, मक्याचे कणीस विकणारे, भाजीपाला, फळ आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी ठाण मांडले आहे. त्यामुळे पायी चालणाऱ्यांना रस्त्यावरून चालावे लागते. पदपथ मोकळे नसल्यामुळे रस्त्यावरून चालणाऱ्यांचाही जीव धोक्यात आला आहे. महापालिकेचे पथक या रस्त्यावरील अतिक्रमणावर कारवाई करताना दिसत नाही.
रुग्णवाहिकांचे सतत आवागमन
अजनी रेल्वे पुलावरून मेडिकल रुग्णालयात जाण्यासाठी मुख्य रस्ता आहे. त्यामुळे शहराबाहेरून आलेल्या रुग्णवाहिका या रस्त्यावरूनच रुग्णालयात जातात. त्यामुळे या चौकात वाहतूक पोलीस तैनात करण्याची गरज आहे.
आणखी वाचा-सावधान! नागपुरातील ‘या’ भागात चिकनगुनिया व डेंग्यूचे इतके रुग्ण…
शाळेत जाण्यासाठी एकच मुख्य रस्ता असल्यामुळे प्रवेशद्वारासमोर मोठी गर्दी होते. याच रस्त्यावर वाहनांची मोठी वर्दळ असते. त्यामुळे वाहतूक कोंडी होते. स्कूलव्हॅन आणि ऑटोसुद्धा वाहतूक कोंडीत अडकतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी उशीर होतो.
पोलीस काय म्हणतात?
अजनी रेल्वे पुलाजवळील रस्त्यावर नेहमीसाठी दोन वाहतूक पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. वाहतूक कोंडी होऊ नये आणि वाहतूक नियंत्रण करण्यासाठी पोलीस प्रयत्न करीत असतात, असे अजनी वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक रितेश अहेर यांचे म्हणणे आहे.
वाहन चालकांचे म्हणणे काय?
अजनीतील रेल्वे मेन्स शाळेसमोरील वळण धोकादायक असून भरधाव वाहनांमुळे अपघात होण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे सकाळी आणि सायंकाळी या शाळेसमोर वाहतूक पोलीस नियुक्त केल्यास भविष्यातील अनर्थ टळू शकतो, असे वाहनचालक पुंडलिक धकाते यांनी सांगितले.
© The Indian Express (P) Ltd