नागपूर : प्रत्येकाने स्वतःला गांधीवादी म्हणवून घेण्याची गरज नाही. गांधींच्या विचारांचे केवळ अनुकरण करण्यापेक्षा ते आचरणातून आणि कृतीतून दिसणे अधिक महत्त्वाचे आहे. आपल्या कृतीत गांधीविचार प्रतिबिंबित होत असतील, तर त्याला वेगळ्या नावाची आवश्यकता नाही, असे मत महात्मा गांधी यांचे पणतू, विचारवंत आणि साहित्यिक तुषार गांधी यांनी व्यक्त केले.

‘लोकसत्ता’च्या कार्यालयाला मंगळवारी त्यांनी सदिच्छा भेट दिली. या वेळी त्यांनी जंतर-मंतरवरील जेन-झीच्या आंदोलनासह देशातील राजकीय परिस्थिती, संविधान आणि युवा पिढीच्या भूमिकेवर भाष्य केले.गांधींच्या विचारांविरोधात सुरू असलेल्या प्रचाराबाबत बोलताना तुषार गांधी यांनी निराशेबरोबरच आशाही व्यक्त केली. कधीकधी आपण कुठे चाललो आहोत, असा प्रश्न पडतो. मात्र, जेव्हा-जेव्हा आपल्या अस्तित्वावर धोका निर्माण झाल्याचे लोकांना जाणवते, तेव्हा ते गांधी आणि गांधीविचारांकडे वळतात, असे त्यांनी सांगितले.

जंतर-मंतरवरील जेन-झीच्या आंदोलनात गांधीविचारांची छाप दिसून आल्याचे ते म्हणाले. आंदोलकांनी गांधींचा उल्लेख केला नसला, तरी त्यांनी गांधींच्याच मार्गाने आंदोलन केले. पोलिसांकडून लाठीचार्ज होत असतानाही आंदोलकांनी हात जोडून नमस्कार केला. लाठी लावाल, बंदूक लावाल, तरी आम्ही हिंसेचा मार्ग स्वीकारणार नाही, हा विचार गांधींच्या विचारातूनच आला आहे. गांधींचे नाव न घेता त्यांच्या मार्गावरून चालणे महत्त्वाचे आहे, असे त्यांनी नमूद केले. आंदोलनात सहभागी झालेल्या एकाही मुलाच्या खिशात सुरा किंवा बंदूक नव्हती, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

गांधींना शिक्षणातून दूर करण्याच्या प्रयत्नांवर टीका करताना त्यांनी गांधींचे नाव घेण्यास विरोध करणाऱ्यांनाच गांधी आजही आव्हानात्मक वाटत असल्याचे सांगितले. एखादी गोष्ट दडपून ठेवली की तिच्याबद्दलची उत्सुकता वाढते, असे ते म्हणाले. गांधीहत्येनंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर घातलेली बंदी आणि त्यानंतर संघ अधिक शक्तिशाली होऊन पुढे आल्याचे उदाहरणही त्यांनी दिले.

संविधानाच्या स्थितीबाबत चिंता व्यक्त करताना संविधान केवळ पुस्तक राहून त्याचे फक्त कव्हर शिल्लक राहण्याची परिस्थिती निर्माण केली जात आहे, अशी टीका त्यांनी केली. संविधानामुळे निर्माण झालेल्या संस्थांची आजची अवस्था चिंताजनक असल्याचेही त्यांनी सांगितले.

काँग्रेसला स्वतःची विचारधाराच माहीत नाही

इंदिरा गांधी यांच्यानंतर काँग्रेसमध्ये निर्माण झालेली वैचारिक पोकळी अद्याप भरून निघालेली नाही. पक्षातील अनेकांना काँग्रेसची विचारधाराच माहीत नसल्याने भाजपच्या प्रचाराला प्रभावी प्रत्युत्तर देता येत नाही. प्रादेशिक नेतृत्वातील गटबाजीमुळे पक्षाची एकसंध भूमिका समोर येत नसल्याचे तुषार गांधी यांनी सांगितले.

ब्रेनवॉशशिवाय भाजप-आरएसएसकडे दुसरा पर्याय नाही

जेन-झीच्या आंदोलनानंतर भाजप आणि आरएसएसकडून तरुणांना आपल्याकडे वळवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. ब्रेनवॉशशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्याय नाही. त्यामुळे जेन-झीचे आंदोलन कुठून आले, यामुळे ते गोंधळलेले दिसतात, असे गांधी म्हणाले.