नागपूर : आजी आणि नातवाच्या नात्याला काळीमा फासणारी आणखी एक घटना शनिवारी गणेशपेठ पोलिसांनी चव्हाट्यावर आणली. मैत्रिणीवर पैसे उधळण्यासाठी आतूर झालेल्या नातवानेच आजीचे दागीने चोरून ते उमरेड येथे सराफ व्यावसायिकाकडे गहाण ठेवत रोख रक्कम उचलल्याचे पोलिसांनी केलेल्या तपासासून समोर आले. सुभद्रा किशोर मस्ते या सेवानिवृत्त ज्येष्ठ महिला गणेशपेठ पोलीस हद्दीत इंदिरा नगर येथील झोपडपट्टीत राहतात. त्या इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कर्मचारी होत्या.
निवृत्ती नंतर त्यांनी उतारवयात कामी यावेत म्हणून त्यांनी सेवेच्या काळात थोडे थोडे पैसे साठवत सोन्याच्या दागीन्यांमध्ये गुंतवणूक केली होती. दरम्यान त्यांचे ३० मेच्या रात्री घरातल्या कपाटातून साडेतीन तोळे सोन्याचे दागीने, आणि रोख रक्कम चोरीला गेली होती. या प्रकरणी त्यांनी गणेशपेठ पोलिसांत चोरीची तक्रारही दाखल केली. तपासादरम्यान पोलिसांनी सर्व शक्यता पडताळून पाहिल्या. त्यात ओळखीतल्या आणि जाणकारानेच शिताफीने चोरी केल्याचे पोलिसांना सकृतदर्शनी दिसले. पोलिसांनी तपासाची दिशा ओळखीतल्या लोकांभोवती केंद्रीत केली.
दरम्यान मस्ते यांचा नातू तुषार याच्यावर पोलिसांना संशय आला. पोलिसांनी अधिक खोलात जाऊन चौकशी केली असता सुभद्रा यांच्याच मुलाचा मुलगा तुषार प्रदिप मस्ते यानेच मैत्रिणीवर पैसे उधळण्यासाठी आजीचे दागीने आणि रोख रक्कम चोरल्याचे निष्पन्न झाले. ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने चोरलेले दागीने उमरेड येथील सराफा व्यावसायिकाकडे गहाण ठेवल्याचे कबूल केले.
पोलिसांनी या प्रकरणात दागिन्यांची कसलीही शहनिशा अथवा बिले न तपासता चोरीचे दागीने खरेदी केल्या प्रकरणात उमरेड येथील सराफा व्यावसायिक जितेंद्र हरिभाऊ अड्याळवाले याची देखील चौकशी केली. त्याने सोन्याच्या दागीन्यांची बीले न तपासता दागीने गहाण ठेवून घेत रोख रक्कम दिल्याचे समोर आले. पोलिसांनी या प्रकरणात नातवाला अटक करत सराफा व्यावसायिकाकडून चोरलेले साडेतीन तोळे दागीने आणि १३ हजारांची रोख रक्कम जप्त केली.
सतत घडतायत घटना
नात्याला काळीमा फासणाऱ्या रक्तरंजीत घटना सातत्याने घडत आहेत. लष्करीबागेत काही दिवसांपूर्वी नशेच्या आहारी गेलेला चुलत नातू राज बागडे याने २२ मे रोजी आजी इंदू चव्हाण (६५) यांचा दगडाने डोके ठेचून खून केला होता. त्याच्या आदल्याच दिवशी हिंगणा येथे टंगधरा येथे सख्खा मोठा हरिश्चंद्र पंधराम याने धाकटा भाऊ शुभमला झोपेत संपवले होते
