प्रशिक्षणाला विलंब, ओबीसी संघटनांची टीका

नागपूर : महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेने (महाज्योती) ओबीसी, व्हीजेएनटी आणि विशेष मागास वर्गातील युवकांना ‘कमर्शियल पायलट’चे नि:शुल्क प्रशिक्षण देण्यासाठी नागपूर फ्लाइंग क्लबशी सामंजस्य करार केला. त्यासाठी अडीच कोटी रुपये क्लबला दिले, परंतु क्लब चार वर्षांपासून बंद आहे. त्यामुळे युवकांना प्रशिक्षण मिळण्यास विलंब होत असल्याची टीका ओबीसी विद्यार्थी संघटनांनी केली आहे.

महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक प्रदीपकुमार डांगे यांनी ७ जानेवारी २०२१ च्या संचालक मंडळाच्या बैठकीत ओबीसी व भटक्या जाती जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी महाज्योतीच्या वतीने कमर्शियल पायलट प्रशिक्षण नि:शुल्क देण्याची योजना सादर केली. संचालक मंडळाची ३१ मे २०२१ रोजी त्यास मंजुरी दिली. त्यानंतर डांगे यांनी नागपूर फ्लाइंग क्लबला विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षणासाठी अडीच कोटी रुपये दिले. मात्र हा फ्लाइंग विविध तांत्रिक अडचणीमुळे गेल्या चार (२०१७) वर्षांपासून बंद आहे. प्रशिक्षण उड्डाण करण्याचा परवाना चार वर्षांपासून क्लबकडे नाही. प्रशिक्षणासाठी आवश्यक विमाने, दुरुस्तीची साधने व पुरेसे मनुष्यबळही फ्लाइंग क्लबकडे नाही. तेव्हा बंद क्लबशी करार करून त्यांच्या खात्यात रक्कम वळती करण्याची घाई करण्यात का आली, असा आक्षेप ओबीसी मुक्ती मोर्चाने घेतला आहे.

दरम्यान, फ्लाइंग क्लबने डीजीसीएकडे प्रशिक्षण उड्डाण करण्याची परवानगी मागितली आहे. डीजीसीएचे पथक नागपूर फ्लाइंग क्लबची पाहणी केल्यानंतरच परवाना मिळाले, असे एका अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. यासंदर्भात महाज्योतीचे संचालक लक्ष्मण वडले म्हणाले, वैमानिक प्रशिक्षणाची योजनेला संचालक मंडळाने मंजुरी दिली आहे. व्यवस्थापकीय संचालकांनी क्लब बंद असल्याची खातरजमा करून घ्यायला हवी होती. परंतु विद्यार्थ्यांच्या निवडीच्या प्रक्रियेला दोन-तीन महिने लागणार आहेत. तोपर्यंत क्लब सुरू होणे अपेक्षित आहे. अन्यथा क्लबला दिलेली रक्कम परत घेऊन इतर क्लबशी करार करण्याचा पर्याय उपलब्ध आहे, असेही वडले म्हणाले.

नागपूर फ्लाइंग क्लब हा शासकीय क्लब आहे. त्यांच्याशी पाच वर्षांचा करार करण्यात आला आहे. त्याच्या क्षमता वाढीसाठी महाज्योतीने अडीच कोटी रुपये दिले. त्याबदल्यात युवकांना सवलतीच्या दरात प्रशिक्षण मिळणार आहे. हा क्लब बंद नसून क्लबचे अद्ययावतीकरण होत आहे.

– प्रदीपकुमार डांगे, व्यवस्थापकीय संचालक, महाज्योती.