महेश बोकडे, लोकसत्ता
नागपूर : राज्यात वाहन चालवण्याचा परवाना (लायसन्स) आणि वाहन नोंदणी प्रमाणपत्रांचे (आरसी) नवीन लेझर प्रिंट युक्त ‘स्मार्ट कार्ड’ जुलैपासून मिळणार होते. त्यापूर्वी जुन्या कंपनीने छपाई बंद केली. नवीन कंपनीलाही छपाई सुरू करण्यास विलंब झाल्याने राज्यातील २७ कार्यालयात २.५ लाख परवाने प्रलंबित आहेत. हे परवाने आठवडाभरात संबंधितांना मिळतील, असा दावा परिवहन खात्याने केला आहे.
परिवहन खात्याने नवीन स्मार्ट कार्डचे काम कर्नाटकातील ‘द एमसीटी कार्ड ॲन्ड टेक्नोलॉजी प्रा. लि.’ला दिले. त्यापूर्वी हे काम हैदराबादमधील रोझमार्टा कंपनीकडे होते. स्मार्ट कार्डचे काम नवीन कंपनीला गेल्याने जुन्या कंपनीने छपाई बंद केली. नवीन कंपनीला काम सुरू करण्यास विलंब झाला. त्यामुळे राज्यात मोठ्या संख्येने परवाने आणि ‘आरसी’ अडकून पडल्या.
आणखी वाचा-धक्कादायक..! राज्यात प्रत्येक ३९ मिनिटाला एक नवजात मृत्यू
दरम्यान, परिवहन खात्याने संबंधित कंपनीला स्मार्ट कार्ड छपाईस गती देण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता काही निवडक ‘आरसी’ शिल्लक आहेत. त्याही संबंधितांना लवकरच मिळणार आहेत. राज्यातील २७ कार्यालयातील २.५ लाख परवाने मात्र अडकलेलेच आहेत.
‘लेझर प्रिंट’चा फायदा काय?
‘स्मार्ट कार्ड’ हे ‘लेझर प्रिंट’द्वारे तयार झाले आहे. त्यामुळे जुन्या स्मार्ट कार्डसारखी माहिती अस्पष्ट होण्याची समस्या या नवीन स्मार्ट कार्डमध्ये येणार नाही.
आणखी वाचा-‘मेडिकल’च्या वसतिगृहात रॅगिंग? रात्री विद्यार्थ्यांना…
नागपुरात १० दिवसांत स्मार्ट कार्ड
नवीन स्मार्ट कार्ड छपाईला गती मिळाल्याने नागपूर शहर, ग्रामीण आणि पूर्व नागपूर आरटीओ कार्यालयातील आरसी आणि परवान्याची प्रतीक्षा यादी जवळपास संपुष्टात आली आहे. २० ऑगस्ट ते २० सप्टेंबर दरम्यान नागपूर जिल्ह्यात १२ हजार ५२२ उमेदवारांना परवाने आणि ३ हजार उमेदवारांना ‘आरसी’चे स्मार्ट कार्ड्स दिले गेले. आता दहा दिवसांतच स्मार्ट कार्ड मिळत आहेत. या प्रक्रियेवर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र भुयार लक्ष ठेवून आहेत.
आरटीओ कार्यालयात नव्याने येणाऱ्यांना आता ‘आरसी’ आणि परवान्याचे स्मार्ट कार्ड दिले जात आहेत. आधीच्या प्रलंबित स्मार्ट कार्ड छपाईलाही गती दिल्याने तेही येत्या सात दिवसांत मिळतील. -विवेक भिमनवार, परिवहन आयुक्त, मुंबई.