नागपूर : पारशिवनी येथून जेरबंद करण्यात आलेल्या वाघिणीने गोरेवाडा बचाव केंद्रात चार बछड्यांना जन्म दिला. मात्र, जन्म देताक्षणीच एका बछड्याचा तर चार दिवसांनी दूसऱ्या बछड्याचा मृत्यू झाला. गोरेवाडा प्रशासनात वन्यप्राण्यांसाठी कायमस्वरुपी प्रसुतीतज्ज्ञ असतानाही ते या वाघिणीच्या गर्भारपणापासून अनभिज्ञ असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
गोरेवाड्यात अत्याधुनिक सुविधांनी युक्त असे वन्यजीव संशोधन व प्रशिक्षण केंद्र आहे. याठिकाणी एक कायमस्वरुपी वन्यप्राण्यांसाठी प्रसुतीरोगतज्ज्ञ, दोन शल्यविशारद आणि दोन औषधीमधील तज्ज्ञ पशुवैद्यकीय अधिकारी आहेत. महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाने (माफसू) या नियुक्त्या केल्या. यातील तीन नियुक्त्या कायमस्वरुपी तर दोन प्रतिनियुक्ती आहेत. तज्ज्ञ पशुवैद्यकीय अधिकारी आणि सर्व अत्याधुनिक सुविधा असताना देखील वाघांचे मृत्यू होत आहेत. यापूर्वी चोरबाहूली येथून आणलेल्या वाघाच्या दोन्ही बछड्यांचा मृत्यू झाला होता. पारशिवनी येथून आणलेली वाघीण गर्भारपणाच्या अंतिम टप्प्यात असताना प्रशासनातील अधिकाऱ्यांसह पशुवैद्यकीय अधिकारी अनभिज्ञ होते. त्यामुळे या केंद्रावर आणि त्यातील नियुक्त्यांवर प्रश्नचिन्ह उभे केले जात आहेत. २४ एप्रिलला चार बछड्यांना जन्म दिल्यानंतर ती वाघीण एका बछड्यावर बसली आणि गुदमरून त्या बछड्याचा मृत्यू झाला. तर दोन ते तीन दिवसाने दुसऱ्या बछड्यांचाही मृत्यू झाला. एका काळजीवाहकाच्या लक्षात ही बाब आल्यानंतर उर्वरित दोन बछड्यांना वाघिणीपासून वेगळे करण्यात आले. वेळेआधीच बछड्यांचा जन्म झाल्याचा प्रशासनाचा दावा ग्राह्य धरला तर गोरेवाड्यातील वन्यजीव संशोधन व प्रशिक्षण केंद्रातील अत्याधुनिक ‘इनक्युबेटर’ च्या उपयोगावरही प्रश्नचिन्ह आहे.
आतापर्यंत ११ बछड्यांचा मृत्यू !
बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणीसंग्रहालयात देखील यापूर्वी ‘ली’ वाघिणीने तीनवेळा बछड्यांना जन्म दिला. मात्र, त्या प्रत्येकवेळी बछडे मृत पावले. तर गोरेवाडा बचाव केंद्रात अलीकडेच चोरबाहूली येथून आणलेल्या दोन बछड्यांचा आणि आता जन्मत:च दोन बछड्यांचा मृत्यू झाला. तब्बल ११ बछड्यांच्या मृत्यूनंतरही त्याची सखोल चौकशी झालेली नाही. माफसू आणि वनविकास महामंडळ यासाठी जबाबदार नाही का, असाही प्रश्न याठिकाणी उपस्थित झाला आहे.
वनविकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक संजीव गौड यांना विचारले असताना या प्रकरणातील घडामोडींची माहिती त्यांना नसल्याचे त्यांनी सांगितले. तर महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रशेखरन बाला एन. यांनी गोरेवाडा प्रशासनाला वाघिणीच्या गर्भारपणाची माहिती होती असे सांगितले. गोरेवाड्याचे विभागीय व्यवस्थापक यांनी बछड्यांची पूर्ण वाढ झालेली नव्हती, असे सांगितले.
वाघिणीच्या गर्भारपणाचा कालावधी हा साधारण १०५ दिवसांचा होतो. ७० ते ८० दिवसानंतर तिचे पोट मोठे दिसायला लागते. छातीचा भाग मोठा दिसायला लागतो. मात्र, या वाघिणीत अशी कोणतीही लक्षणे दिसून आली नाही, असा दावा गोरेवाडा प्रशासनाने केला. तर दुसरीकडे वनविकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी गोरेवाड्यातील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना या घटनेची माहिती असल्याचे सांगितले. प्रशासनातील अधिकाऱ्यांमध्ये यावेळी समन्वयाचा अभाव दिसून आला.