लोकसत्ता टीम

गडचिरोली : सिरोंचा तालुक्यातील जानमपल्ली येथे विहिरीचे खोदकाम करताना मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून दोन मजुरांचा मृत्यू झाला. ८ एप्रिल रोजी सकाळी साडेनऊ वाजता ही घटना घडली. दरम्यान, सायंकाळी पाच वाजेपर्यंत मजुरांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले नव्हते. रवी अंकुलु उप्पुला (२८) समय्या अमय्या कोंडा (३०, दोघे रा. जानमपल्ली ता. सिरोंचा) अशी मृतांची नावे आहेत.

गावातील एका शेतकऱ्याच्या शेतात शासकीय योजनेतून मंजूर झालेल्या सिंचन विहिरीचे खोदकाम सुरु होते. ५० फूट खोल विहिर खोदली होती. ८ रोजी रवी उप्पुला व समय्या कोंडा हे दोघे विहिरीत उतरुन खोदकाम करत होते. दरम्यान, याचवेळी मातीचा लगदा कोसळला, त्याखाली दोघेही दबले गेले. यावेळी इतर मजुरांनी आरडाओरड केली, त्यानंतर स्थानिक नागरिक धावले. सर्वांनी मिळून त्या दोघांना विहिरीबाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु केले, पण मातीखाली दबल्याने त्यांचा मृत्यू झाला.

यातील एका मजुराने मातीच्या ढिगाऱ्यातून वर येण्यासाठी खूप धडपड केली, त्या ढिगाऱ्यातून त्याचा हात बाहेर आलेला दिसत आहे. आठ तास उलटूनही त्यांना बाहेर काढता आलेले नाही. घटनास्थळी सिरोंचा पोलिसांनी धाव घेतली आहे. स्थानिकांच्या मदतीने पोलिसांनी देखील त्या दोन मजुरांना वाचविण्यासाठी प्रयत्न केले, पण यश आले नाही . गावातील नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे.

अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी

ही विहीर शासकीय योजनेतून खोदली जात होती. या कामावर तांत्रिक अधिकाऱ्यांचे नियंत्रण असणे गरजेचे आहे. मात्र, विहिरीवर मजूर राबत असताना तांत्रिकदृष्ट्या मार्गदर्शन करणारे कोणतेही अधिकारी उपस्थित नव्हते, त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.