बुलढाणा : दिवं. शुकदास महाराज संस्थापक असलेल्या मेहकर तालुक्यातील हिवरा आश्रम येथे आयोजित विवेकानंद जयंती महोत्सवाची शनिवारी अभूतपूर्व महाप्रसाद वितरणाने सांगता झाली. ४० एकर विस्तीर्ण क्षेत्रावर एकाचवेळी ५३ पंगतींमधून राज्यभरातूनतून आलेल्या सुमारे दोन लाख भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. १०१ ट्रॅक्टरच्या मदतीने तीन हजार स्वयंसेवकांनी शिस्तबद्ध पद्धतीने महाप्रसादाचे वितरण केले.

स्वामी विवेकानंद जयंती महोत्सवानिमित्त हिवरा आश्रम येथे आयोजित महाप्रसादाचा लाभ राज्यभरातून आलेल्या तब्बल दोन लाखांहून अधिक भाविकांनी घेतला. या महापंगतीने गेल्या ६३ वर्षांच्या परंपरेतील भाविकांच्या उपस्थितीचा स्वतःचाच विक्रम मोडीत काढला. महाप्रसादापूर्वी ‘स्वामी विवेकानंद की जय’, ‘भारत माता की जय’, ‘शुकदास महाराज की जय’ जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमला होता. शुकदास महाराज यांच्या ‘आरती करू ब्रह्मरूपाला’ या भावपूर्ण आरतीनंतर महाप्रसाद वितरणास प्रारंभ झाला. सायंकाळी सुमारे दोन लाख भाविकांच्या महापंगतीने या भव्य सोहळ्याची सांगता झाली.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, माजी आमदार संजय रायमुलकर, विठ्ठल रुक्मिणी मंदिर पंढरपूरचे विश्वस्त प्रकाश महाराज, असोबा संस्थांनचे आसाराम भारती यांच्या हस्ते महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. ४० एकर परिसरात एकाच वेळी ५३ पंगती बसविण्यात आल्या होत्या. तब्बल १०१ ट्रॅक्टरद्वारे व सुमारे तीन हजार स्वयंसेवकांच्या सहभागातून महाप्रसादाचे नियोजन करण्यात आले. कोणतीही अस्वच्छता न करता अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने ही महापंगत पार पडली. विवेकानंद शिक्षण संकुलातील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी भाविकांचे कुंकू-चंदन तिलक, धूप व आरतीद्वारे पूजन करून स्वागत केले. भाविकांनी अत्यंत भक्तिभावाच्या वातावरणात महाप्रसादाचा आस्वाद घेतला.

सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी विवेकानंद आश्रमाचे आजी-माजी विश्वस्त, पदाधिकारी व स्वयंसेवकांनी अथक परिश्रम घेतले. दरम्यान, पोलीस उपविभागीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली साखरखेर्डा पोलीस ठाण्याचे ठाणेदार व कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

यावेळी युवा सेना जिल्हाध्यक्ष ऋषी जाधव, मेहकर नगराध्यक्ष किशोर गारोळे, काँग्रेस प्रदेश सरचिटणीस श्याम उमाळकर, भाजपा नेते सुरेश आप्पा कबुतरे, भास्कर मोरे, दत्ता खरात,गिरधर ठाकरे,निंबा पांडव, सिद्धेश्वर पवार,तहसीलदार निलेश मडके, सुरेश मुंदडा, रिसोड नगर अध्यक्ष भागवत क्षीरसागर, विवेकानंद आश्रमचे अध्यक्ष अध्यक्ष आर. बी. मालपाणी, उपाध्यक्ष अशोक थोरहाते, अशोक पाध्ये, सचिव संतोष गोरे, सहसचिव आत्मानंद थोरहाते, विश्वस्त कैलास भिसडे, पुरुषोत्तम आकोटकर, दयानंद थोरहाते, अशोक गिऱ्हे,एकनाथ दुधे, सुरेश जुनघरे, डॉक्टर अतुल जुनघरे, डॉक्टर . नुतन जुनघरे, डॉ. अंजली काळे, प्राचार्या बबिता काळे, नंदाराम काळे, संजय वडतकर, मनोहर गिऱ्हे, नितीन इंगळे, विठ्ठल भाकडे, प्रमोद रायमूलकर, समाधान म्हस्के, सदाशिव काळे, ओमप्रकाश देवकर, भरत सारडा, मनीष मांडवगडे, शिवप्रसाद थुट्टे, प्राचार्य आर. डी. पवार, डॉ.सुभाष कालवे, संजय भरती, शिवदास सांबपुरे, डॉ. पंढरीनाथ शेळके, मंगेश जकाते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.