भंडारा : जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील पोलीस स्टेशन अड्याळ हद्दीतील दोन वेगवेगळया गावामध्ये दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचाराच्या घटना घडल्या. त्या एकाच दिवशी दोन घटना समोर आल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ माजली आहे.
पवनी तालुक्यातील अड्याळ पोलिस स्टेशन हद्दीतील दोन गावात गुरुवारी एकाच दिवशी दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचाराच्या घटनांचे गुन्हे दाखल करण्यात आले असून दोन्ही घटनेतील आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास सुरू असल्याची माहिती यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी मनोज शिडाम, अड्याळ पोलिस स्टेशन ठाणेदार धनंजय पाटील यांनी दिली आहे.
दोन्ही घटनेत कलम ६४ (२) (आय), ६५ (२), १३७ (२) भारतीय न्याय संहिता, सहकलम ४,६ पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पहिल्या घटनेत, मुलगी अल्पवयीन असल्याचे माहीत असतानाही तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्याशी तीन ते चार वेळा कुकृत्य करण्यात आल्याची तक्रार आहे. यामुळे ती गरोदर राहिल्याने तिच्या तक्रारीवरून अभय विलास धुर्वे (२१) याच्याविरुद्ध गुन्ह दाखल करून अटक करण्यात आली.
बालिकेला घरातून नेले
दुसऱ्या घटनेत ७ वर्षीय मुलीवर बळजबरीने लगतच्या शेतात नेऊन अत्याचार केल्याची घटना घडली. ५ जूनला सायंकाळी ही बालिका आपल्या घरी खेळत असताना ७:२० वाजताच्या दरम्यान, आरोपीने तिचे तोंड दाबून लगतच्या वाडीत नेले. तिथे अत्याचार केला. काही वेळाने बालिका रडत घरी आल्यावर आईला प्रकार कळला. आईच्या तक्रारीवरून गणेश ज्ञानेश्वर गोटेफोडे (३०) याला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली.