नागपूर : नीट आणि जेईईच्या तयारीसाठी नागपुरात आलेल्या दोन विद्यार्थिनींसोबत ८० वर्षीय घरमालकाने अश्लील चाळे करून वियनभंग केला. घाबरलेल्या विद्यार्थिनी सीताबर्डी पोलीस ठाण्यात पोहोचल्या. त्यांच्या तक्रारीवरून आरोपी वृद्ध श्रीराम पाटील याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पाटील याची धरमपेठ परिसरात तीन मजली इमारत आहे. त्याला तीन मुली आहेत. तिन्ही विवाहित आहेत. एक मुलगी प्राध्यापिका आहे. नगररचना विभागात चांगल्या पदावरून तो सेवानिवृत्त झाला आहे. तिसऱ्या मजल्यावर एक विवाहित मुलगी राहते, तर खालच्या माळ्यावर श्रीराम पाटील पत्नीसह राहतो. बाजूच्या खोलीत पीडित विद्यार्थिनी किरायाने राहतात. एक विद्यार्थिनी नीट, तर दुसरीला जेईईची तयारी करायची होती. त्यासाठी कुटुंबीयांनी त्यांना नागपुरात पाठविले. धरमपेठ परिसरातील एका शिक्षण संस्थेत त्यांनी प्रवेश घेतला. शिक्षणासाठी सोईचे व्हावे म्हणून त्यांनी जवळच किरायाने खोली घेतली. घरमालक पाटीलची दोघींकडे वाईट नजर होती. शनिवारी सुटी असल्याने १६ वर्षीय पीडित विद्यार्थिनी वाचनालयात गेली होती. सायंकाळी ६ वाजता घरी परतली. त्यावेळी पाटील हा गेटवरच होता. पीडितेने गेट लावून आत शिरताच त्याने मुलीशी अश्लील चाळे करीत तिचा विनयभंग केला. भयभीत झालेली विद्यार्थिनी घरातील एका कोपऱ्यात बसून होती. हेही वाचा >>>बुलढाणा : ‘भक्तिमार्गा’विरोधात शेकडो शेतकरी रस्त्यावर, चिखलीत ‘रास्ता रोको’ याबाबत तिने सहकारी मैत्रिणीला काहीही सांगितले नाही. घटनेच्या चार दिवसांनी रात्री विद्यार्थिनी झोपली असताना पाटील खिडकीतून तिच्याकडे वाईट नजरेने बघत होता. त्यामुळे मुलगी घाबरली. नंतर तिने कागद लावून खिडक्या पूर्णपणे झाकून टाकल्या. घराबाहेर पडताना किंवा घरी येताना पाटील अश्लील संवाद साधत होता. सहकारी मैत्रीण ढसाढसा रडली २ जुलै रोजी पीडित विद्यार्थिनी सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास घरी परतली. तेव्हा तिची सहकारी मैत्रीण शांत बसली होती. तिच्या चेहऱ्यावर भीती आणि चिंतेचे सावट होते. विचारपूस केल्यावर तिने मिठी मारली आणि ढसाढासा रडू लागली. सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास बाहेर वाळत असलेले कपडे आणण्यासाठी गेली असता श्रीराम पाटील याने मिठीत घेऊन अश्लील चाळे केल्याचे तिने सांगितले. रात्री घरात शिरून अश्लील चाळे रात्री ११.३० वाजता पाटील त्यांच्या खोलीत गेला. त्याने दोघींच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला. त्याने एका मुलीचा हात पकडला. त्यानंतर पुन्हा रात्री १२.३० वाजता दार ठोठावले. आता दोघींनाही धडकी भरली होती. काय करावे काही सुचत नव्हते. पाटील याने दोन्ही अल्पवयीन मुलींशी अश्लील चाळे केले. त्यामुळे दोघीही घाबरून घरात बसल्या. त्यांनी संपूर्ण प्रकार नातेवाईकांना सांगितला. लागलीच नातेवाईक नागपुरात आले. मुलींना घेऊन सीताबर्डी ठाणे गाठले. सारा प्रकार सांगितला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता ठाणेदार आसाराम चोरमले यांच्या उपस्थितीत कायदेशीर कारवाई करण्यात आली.