नागपूर : महापालिका निवडणूकीत मतदानाच्या पूर्वसंध्येला गोरेवाडात भाजपाचे माजी नगरसेवक भुषण शिंगणे यांना झालेली मारहाण आणि शुक्रवारी तलावाजवळ दोन समुहांत उसळलेल्या संघर्षानंतर केलेला बेजबाबदारपणा दोन ठाणेदारांना बुधवारी अंगलट आला. कर्तव्यात हयगय करत उशीराने कारवाई करत दिरंगाई केल्याचा ठपका ठेवत दोन्ही ठाणेदारांच्या तडकाफडकी बदल्या करण्यात आल्या.
गिट्टीखदानचे ठाणेदार कैलास देशमाने आणि नंदनवनचे ठाणेदार विनायक कोळी यांच्या तडकाफडकी बदलीचे आदेश बुधवारी पोलीस आयुक्तालयाकडून जारी करण्यात आले. भूषण शिंगणे मारहाण प्रकरण आणि दोन दिवसांपूर्वी गोंडवाना क्लबमध्ये झालेल्या गोंधळात उशीराने कारवाई करत विशिष्ट गटाला झुकते माप दिल्याबद्दल देशमाने यांची तडकाफडकी बदली झाल्याची माहिती मिळत आहे. त्यांच्या जागी पूर्वी वाठोडा येथे कार्यरत द्वितीय पोलीस निरीक्षक विजय दिघे यांना गिट्टीखदान पोलीस ठाण्याची जबाबदारी देण्यात आली.
पुण्यात २०२४मध्ये जेव्हा पोर्शे कार प्रकरण गाजत होते तेव्हा नागपुरातही हिट अँड रन प्रकरणात वाठोडा परिसरात एकाचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात गोळा केलेले आरोपीच्या रक्ताचे नमुने २४ तासांच्या आत जमा केल्याबद्दल गिते यांच्यावर तात्पुरते निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर त्यांची गिट्टीखदान पोलीस ठाण्यात दुय्यम पोलीस निरीक्षक म्हणून बदली झाली. आता त्यांना गिट्टीखदान पोलीस ठाण्याचा प्रभार देण्यात आला आहे. तर नंदनवनचे ठाणेदार विनायक कोळी यांची पोलीस आयुक्तालयात अर्ज शाखेत तडकाफडकी बदली करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार सोमवारी मध्यरात्री सक्करदरा तलावासमोर कॅफेत झालेली जाळपोळ आणि त्यानंतर निर्माण झालेल्या जातीय तणावाच्या पार्श्वभूमीवर ठाणेदार कोळी यांनी उशीराने कारवाई केल्याबद्दल त्यांची बदली करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
मग ठाणे बदलण्याचे कारण काय?
गोंडवान क्लब आणि शिंगणे मारहाण प्रकरणात उशीराने कारवाई केल्याचा ठपका ठेवत कैलास देशमाने यांची बदली झाल्याचे सांगितले जात आहे. असे असताना त्यांना गिट्टीखदानमधून उचलत नंदनवनचे ठाणेदार करून पोलीस आयुक्तांनी काय साध्य केले असा सवाल उपस्थित होत आहे.
सात जणांना अटक
गुरुदेवनगरातील कॅफेच्या जाळपोळ प्रकरणात पोलिसांनी सात जणांना अटक केली आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्मारक भवनात हा एफएस झोन कॅफे आहे. काही तरुण तिथे लघुशंका करत होते. त्यावरून शेखने हटकले. यामुळे वाद व हाणामारी झाली. हे प्रकरण ठाण्यात गेले. नंतर काही तरुण शेखच्या कॅफेजवळ पोहोचले व मध्यरात्रीनंतर कॅफेला आग लावली. आरोपींनी शेखची कारदेखील जाळण्याचा प्रयत्न केला. घटनेची माहिती मिळताच परिसरात तणाव होता. फैजलचा अभिजीत शेळके, राहुल भुरे, ऋषिकेश वाघमारे आणि पंकज तोडसेशी वाद झाला. अभिजीत आणि त्याच्या साथीदारांना अटक केल्यानंतर नेहरू नगर उद्यानात २० ते २५ तरुण जमले. तरुणांनीप्लास्टिकच्या कॅरी बॅगमध्ये पेट्रोल भरून फैजलच्या कॅफेत आग लावली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये ही ओळख पटली. सकाळी तीन जणांनी आत्मसमर्पण केले. या प्रकरणात एकूण सात जणांना अटक झाली असून त्यांना ७ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनाविण्यात आली आहे.

