मुंबईसह राज्याच्या काही भागात गोवरच्या वाढत्या रुग्णसंख्येने आरोग्य विभागाला धडकी भरली असतानाच नागपुरातही या आजाराचे दोन रुग्ण आढळले आहे. तर येथे या आजाराच्या संशयित रुग्णांची वाढती संख्या महापालिकेच्या आरोग्य विभागाची चिंता वाढवत आहे. नागपूर महापालिकेच्या आकडेवारीनुसार १ जानेवारी ते २९ नोव्हेंबर २०२२ दरम्यान उपराजधानीत गोवरचे दोन पाॅझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. परंतु, हे दोन्ही रुग्ण ऑगस्टच्या दरम्यानचे आहेत. तर त्यानंतर १ नोव्हेंबरपासून २९ नोव्हेंबर दरम्यान नागपूर शहरात या आजाराचे १८ संशयित रुग्ण आढळले आहेत. त्यांच नमुने ‘एलायझा’ तपासणीसाठी हैदराबादच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आले. त्यापैकी एकालाही गोवर नसल्याचे स्पष्ट झाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

परंतु, आताही शहरातील खासगी रुग्णालयात मोठ्या संख्येने गोवरचे संशयित मुले आढळत आहे. त्यापैकी अनेक संशयितांच्या नोंदी होत नसल्याचेही निरीक्षण वैद्यकीय क्षेत्रात नोंदवले जात आहे. पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यात या आजाराचे २९२ संशयित आढळले असल्याची आरोग्य उपसंचालक कार्यालयातील आकडेवारीवरून निदर्शनात येत आहे. त्यामुळे आरोग्य विभागाकडून थोडीही चुक झाल्यास या आजाराचे संक्रमण वाढण्याची शक्यता वैद्यकीय क्षेत्रात वर्तवली जात आहे.

हेही वाचा: ‘त्या’ विद्यार्थिनी आणि डॉ. धर्मेश धवनकर प्रकरणावर कारवाईच्या हालचाली!

अशी घ्या काळजी

गोवर हा विषाणूजन्य आजार असल्याने त्यावर विशिष्ट असे औषध नाही. लक्षणांनुसार त्यावर उपचार केले जातात. गोवर झालेल्या रुग्णाने पुरेशी विश्रांती घेणे, इतरांपासून वेगळे राहणे गरजेचे असते. पुरेशा प्रमाणात द्रवपदार्थांचे सेवन करणे व ताप नियंत्रणात ठेवणे महत्त्वाचे ठरते.

हेही वाचा: साहित्यिकांसाठी सद्यस्थिती घाबरविणारी!; ज्येष्ठ लेखिका प्रभा गणोरकर यांचे स्पष्ट मत

घरोघरी सर्वेक्षण

आशा सेविकांच्या मदतीने शहरात घरोघरी सर्वेक्षण केले जात आहे. प्रत्येक आशा सेविकेला ५० घरी रोज सर्वेक्षण करण्याचे लक्ष्य दिले गेले आहे. यावेळी मुलांना लस घेण्यासाठीही प्रोत्साहित केले जात आहे. शहरात तूर्तास हा आजार नाही. परंतु, या आजाराचा येथे शिरकाव होऊ नये म्हणून सगळ्यांनी मुलांचे लसीकरण करण्याचे आवाहन महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार यांनी केले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two patients of measles have been found in nagpur tmb 01
First published on: 30-11-2022 at 09:21 IST