अमरावती : येथील औषधी व्यावसायिक उमेश कोल्हे यांच्या हत्येप्रकरणी राष्‍ट्रीय तपास यंत्रणेच्‍या (एनआयए) पथकाने बुधवारी आणखी दोन आरोपींना अटक केली. या प्रकरणी आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्‍या नऊवर पोहोचली आहे.

मुर्शिद अहमद अब्‍दूल रशीद (४१, रा. ट्रान्‍सपोर्ट नगर) आणि अब्‍दूल अरबाज अ. स‍लीम (२३, लालखडी), अशी आरोपींची नावे आहेत. हत्‍याप्रकरणी निधी संकलन करणे आणि इतर आरोपींना आश्रय दिल्‍याचा आरोप या दोघांवर असल्‍याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. ‘एनआयए’च्‍या पथकाने आरोपींची चौकशी सुरू केली असून आरोपींच्‍या घरांची झडती घेतली जाण्‍याची शक्‍यता आहे.

उमेश कोल्हे यांची गेल्‍या २१ जूनच्या रात्री गळा चिरून हत्या झाल्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने दुसऱ्या दिवशी दोन आणि त्यानंतर अन्य पाच आरोपींना अटक केली. यानंतर केंद्रीय गृहमंत्रालयाने या घटनेचा तपास ‘एनआयए’कडे सोपविला होता.

पोलिसांनी यापूर्वी मुदस्सीर अहमद उर्फ सोनू रजा शेख इब्राहिम (२२), शाहरूख पठाण उर्फ बादशाह हिदायत खान (२५), अब्दूल तौफिक उर्फ नानू शेख तस्लिम (२४), शोएब खान उर्फ भुऱ्या साबीर खान (२२), अतिब रशीद आदिल रशीद (२२), युसूफ खान बहादूर खान (४४) तसेच सूत्रधार शेख इरफान शेख रहीम (३५) या आरोपींना अटक केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या संपूर्ण प्रकरणाचा तपास  ‘एनआयए’ करीत असून अमरावती पोलीस त्यांना तपासात सहकार्य करीत आहे. हत्येचा कट रचणे, आरोपींचा इतर संघटनांशी तसेच आंतरराष्ट्रीय संबंध याविषयी तपास करण्यात येत आहे.