नागपूर:  मुंबईतील विधानभवनात १७ जुलै २०२५ रोजी हाणामारी करणाऱ्या नितीन देशमुख आणि सर्जेराव टकले या दोघांना विधानभवनाची प्रतिमा मलिन केल्याबद्दल आणि आक्षेपार्ह वर्तनाबद्दल दोन दिवसांच्या दिवाणी कारावासाची शिक्षा देण्याची शिफारस विशेषाधिकार समितीने केली आहे. विधानभवनात येणाऱ्या अभ्यागतांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का, हे तपासण्यासाठी विधानभवनाची प्रवेशपत्र प्रणाली पोलिसांच्या गुन्हेगारी डेटाबेस किंवा रेकॉर्डशी संलग्न करावी. त्यामुळे अभ्यागताची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का, हे तपासूनच प्रवेशपत्र जारी करता येईल, असेही समितीने स्पष्ट केले आहे. विशेषाधिकार समिती प्रमुख आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी समितीचा अहवाल शुक्रवारी विधानसभेत सादर केला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते देशमुख आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचे कार्यकर्ते टकले यांच्यात विधानभवनाच्या पायऱ्यांजवळ किंवा पोर्चमध्ये १७ जुलै रोजी सायंकाळी ५.४० वाजता हाणामारी झाली. सुरक्षारक्षकांनी त्यात हस्तक्षेप करुन दोघांनाही ताब्यात घेतले होते. विधानभवनात राजकीय पक्षांच्या हाणामारीचा प्रकार घडल्याने मोठी खळबळ उडाली होती. या प्रकारामुळे विधिमंडळाच्या प्रतिष्ठेला धक्का लावल्याबद्दल आणि अवमानासाठी हे प्रकरण विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांनी विशेषाधिकार भंग समितीकडे सोपविले होते. समितीने दोन्ही आमदार, देशमुख, टकले, विधिमंडळाचे सुरक्षारक्षक, मुख्य सुरक्षा अधिकारी यांच्यासह सर्व संबंधितांचे जबाब व साक्षीपुरावे नोंदविले. समितीच्या १० बैठका झाल्या. त्यानंतर समितीने देशमुख व टकले यांना विधिमंडळाच्या विशेषाधिकार भंगाबद्दल दोषी ठरवून शिक्षेची शिफारस केली आहे.

टकले विधिमंडळात आले कसे ?

पडळकर यांचे कार्यकर्ते १७ जुलै रोजी विधिमंडळात प्रवेशपत्र नसतानाही दाखल झाल्याचे समितीपुढे उघड झाले. ते माझ्याबरोबर विधानभवनात आले, हे मला नंतर समजले, असे पडळकर यांनी समितीपुढे सांगितले. तर मी पडळकर यांच्याबरोबर आत आलो आणि त्याआधीही दररोज विधानभवनात येत होतो. त्या दिवशी माझ्याकडे प्रवेशपत्र नव्हते, ते गाडीत राहिले होते. माझे विधानभवनात काहीही काम नसताना पडळकर यांच्याबरोबर येत होतो, असे टकले यांनी समितीपुढे नमूद केले.

या बाबींची गंभीर दखल घेवून विधानभवन प्रशासनाने सुरक्षा सल्लागारांच्या सल्ल्याने प्रभावी सुरक्षा उपाययोजना कराव्यात. विधानभवनात आमदार, मंत्री व इतर मान्यवर येतात. त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आणि हे प्रकार रोखण्यासाठी चोख सुरक्षाव्यवस्था ठेवावी. आमदारांनी आपल्या अभ्यागतांची जबाबदारी घ्यावी आणि ते विधानभवनात कोणताही गैरप्रकार करणार नाहीत, याची काळजी घ्यावी. प्रवेशपत्राशिवाय कोणालाही आपल्याबरोबर आत आणू नये, अशा शिफारसी समितीे केल्या आहेत. समितीने देशमुख व टकले यांना दोन दिवसांच्या दिवाणी कैदेबरोबरच २०२९ पर्यंत मुंबई नागपूर येथील विधानभवन परिसरात येण्यास बंदी घातली आहे.