गोंदिया बलात्कारप्रकरणी दोन पोलीस निलंबित ; एका महिला पोलिसाची बदली

भंडाऱ्याचे पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली.

गोंदिया बलात्कारप्रकरणी दोन पोलीस निलंबित ; एका महिला पोलिसाची बदली
पीडितेवर दुसऱ्यांदा झालेल्या बलात्कारास पोलिसांची बेफिकिरी कारणीभूत असल्याचे वृत्त ‘लोकसत्ता’ने सोमवार, ८ ऑगस्ट रोजी दिले होत़े

नागपूर : गोंदिया सामूहिक बलात्कारप्रकरणी अखेर लाखनी ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षकासह एका पोलीस शिपायाला निलंबित करण्यात आले आहे. याशिवाय एका महिला कर्मचाऱ्याची तडकाफडकी पोलीस मुख्यालयात बदली करण्यात आली आहे. या कारवाईमुळे या प्रकरणात पोलिसांनी दिरंगाई केल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे, पोलिसांनी तत्परता न दाखवल्यानेच पीडितेवर दुसऱ्यांदा बलात्कार करण्यात आल्याचे वृत्त ‘लोकसत्ता’ने सोमवारी प्रकाशित केले होते. त्यानंतर कारवाईबाबत पोलीस प्रशासनात वेगाने हालचाली घडल्या.

भंडाऱ्याचे पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली. लाखनी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक घराडे आणि सहायक पोलीस उपनिरीक्षक लखन उईके अशी निलंबित करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

दरम्यान, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी सोमवारी दुपारी नागपूरच्या मेडिकल रुग्णालयात जाऊन पीडितेची भेट घेतली. माध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या, ‘‘हे प्रकरण माणुसकीला काळिमा फासणारे आहे. या गुन्ह्याचा खटला जलदगती न्यायालयात चालवण्यात येणार असून आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, यासाठी पोलिसांना सूचना करण्यात आल्या आहेत.’’ या वेळी विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील हेही उपस्थित होते.

आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ

आरोपी अय्याज अन्सारी आणि अमित ऊर्फ लुक्का सारवे यांना ८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश होते. त्यामुळे पोलिसांनी आज त्यांना न्यायालयात हजर केले. न्यायालयाने दोन्ही आरोपींची पोलीस कोठडी शुक्रवापर्यंत वाढवली.

दोन आरोपी अद्याप फरार

या गुन्ह्यात तीन नव्हे तर चार आरोपी सामील आहेत. मात्र, भंडारा-गोंदिया पोलिसांनी आतापर्यंत केवळ दोनच आरोपींना अटक केली. अन्य दोन आरोपींचा छडा पोलिसांना लावता आला नाही. श्रीराम उरकुडे (४५, गोरेगाव) या आरोपीपर्यंतही पोलीस अद्याप पोहोचू शकले नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. 

पोलिसांचे दुर्लक्ष अक्षम्य : नीलम गोऱ्हे

पीडितेला वैद्यकीय उपचाराची गरज असताना तिला पोलीस ठाण्यात बसवून ठेवण्यात आले. तिचे समुपदेशन का केले नाही? तिला मदत करण्यास टाळाटाळ का केली गेली? अशा प्रकरणांमध्ये मार्गदर्शक सूचना धाब्यावर का बसवण्यात आल्या? पोलिसांच्या ताब्यातून महिला बाहेर का पडली, याची चौकशी करावी, अशी मागणी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी गृह विभागाचे अप्पर मुख्य सचिव आनंद लिमये यांच्याकडे केली.

मराठीतील सर्व नागपूर/विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Two policemen suspended in gondia rape case zws

Next Story
राज्यात पाऊस पुन्हा सक्रिय ; कोकणासह पश्चिम महाराष्ट्र, विदर्भात अतिवृष्टीचा इशारा
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी