लोकसत्ता टीम
नागपूर : गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाचा वचक कमी झाल्यामुळे शहरात ड्रग्स तस्करांच्या टोळ्या दिवसेंदिवस वाढत आहेत. गुन्हे शाखा कर्तव्य बजावण्यात कसून ठेवत असल्यामुळे ठाणेदारांना छापे घालून ड्रग्स तस्करांना अटक करावी लागत आहे.




यशोधरानगर पोलिसांनी छापा घालून दोन ड्रग्स तस्करांना अटक करून तीन लाख रुपयांची एमडी ड्रग्स जप्त केली. हे एका पब मध्ये तरुणींना ड्रॅग्स पुरवत होते. शोएब खान जफर खान (१९, विनोबा भावेनगर) आणि सलीम शहा अयुब शहा (निजामुद्दीन कॉलनी) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. तिसरा ड्रग्स तस्कर समीर खान समशेर खान (राजीव गांधीनगर झोपडपट्टी) हा फरार झाला आहे.
आणखी वाचा-नागपूर : एकतर्फी प्रेमातून घरात घुसून अश्लील चाळे, आरोपीला अटक
यशोधराचे ठाणेदार ज्ञानेश्वर भेदोडकर यांच्या पथकाला रविवारी रात्री नऊ वाजता विनोबा भावेनगराच्या प्रवेशद्वारासमोर तीन युवक संशयास्पद स्थितीत फिरत असल्याचे दिसले. पोलिसांनी घेराव घातला. शोएब खान आणि सलीम शहा यांना पोलिसांनी ताब्यात घेतले तर समीर खान हा अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला. आरोपींकडून २७ ग्रॅम एमडी (किंमत २.७८ लाख) जप्त केली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तिसऱ्या आरोपीचा शोध सुरु आहे.