नागपूर : गेल्या काही वर्षांपासून देशात अभियांत्रिकी महाविद्यालयांमधील जागा मोठय़ा प्रमाणात रिक्त राहत असल्याने आणखी दोन वर्षे नवीन अभियांत्रिकी संस्था उघडणे आणि वाढीव जागा देण्यावर अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) बंदी घातली आहे, अशी माहिती ‘एआयसीटीई’चे अध्यक्ष डॉ. अनिल सहस्त्रबुद्धे यांनी दिली. सोमवारी नागपुरात आले असता ते पत्रकारांशी बोलत होते.

देशात अभियांत्रिकी महाविद्यालयांचे मोठय़ा प्रमाणात पीक आल्याने दरवर्षी लाखो जागा रिक्त असतात. २०२० मध्ये देशातील २५ लाख ३९ हजार जागांवर केवळ १४ लाख १० हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. २०२१ मध्येही २४ लाख ४२ हजार जागांवर केवळ १२ लाख ७५ हजार विद्यार्थ्यांची नोंदणी होती. रिक्त जागांमुळे अभियांत्रिकी महाविद्यालयांसमोरही मोठे संकट उभे ठाकले होते. परिणामी, संस्थांच्या दर्जामध्येही घट झाली होती. त्यामुळे ‘एआयसीटीई’ने अभियांत्रिकी महाविद्यालयांसदर्भात अभ्यास करण्यासाठी आयआयटी हैदराबादचे अध्यक्ष रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली समितीही तयार केली होती. या समितीच्या अहवालानुसार, नवीन अभियांत्रिकी संस्थांवर २०२०-२१ पर्यंत स्थगिती जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर २०२१-२२ पासनूही स्थगिती कायम ठेवण्यासंदर्भात पुनरावलोकनाचे कामही या समितीला देण्यात आले होते. समितीच्या अहवालानुसार यापुढील दोन वर्षे नवीन अभियांत्रिकी संस्था उघडण्यास आणि जागा वाढवून देण्यास बंदी घालण्यात आली आहे.

तीन अटींवर संस्थांना सवलत..

गेल्या काही वर्षांत अभियांत्रिकीमधील पाचशेहून अधिक महाविद्यालये बंद करण्यात आली. दरवर्षी ही संख्या वाढत आहे. त्यामुळे नवी महाविद्यालये आणि वाढीव जागा देण्यावर बंदी घातली असली तरी तीन प्रकारच्या परिस्थितीत काही संस्थांना सवलत देता येणार आहे. त्यामध्ये जिथे अभियांत्रिकी अभ्यासक्रमाची आवश्यकता आहे. तसेच ज्यांची वार्षिक आर्थिक स्थिती उत्तम आहे. याशिवाय २० ते २५ वर्षांचा अनुभव असणाऱ्या संस्थांना नवीन महाविद्यालय आणि वाढीव जागा देता येतील , असे डॉ. अनिल सहस्त्रबुद्धे यांनी सांगितले.

‘ब्रिज कोर्स’चा लाभ

विद्यार्थ्यांना अनेकदा पालकांच्या दडपणामुळे या अभ्यासक्रमात प्रवेश घ्यावा लागतो. नंतर ते मध्येच शिक्षण सोडतात. त्यामुळे त्यांना पदवी मिळत नाही. नव्या शैक्षणिक धोरणात अशा विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. मात्र, त्यासाठी अशा विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम सोडताना त्यांच्या आवडीचा ‘ब्रीज कोर्स’ देण्यात येणार आहे. तो पूर्ण केल्यावर त्यातून नोकरीची संधी असेल. याशिवाय पुढील आठ वर्षांत पुन्हा या अभ्यासक्रमात प्रवेश घ्यायचा असल्यास नव्याने सुरुवात करण्याची गरज राहणार नाही. ‘ब्रीज कोर्स’च्या समोरच्या अभ्यासक्रमचा पर्याय स्वीकारता येईल, असेही सहस्त्रबुद्धे यांनी स्पष्ट केले.