दोन वर्षांनंतर दिवाळीच्या तयार फराळाला सुगीचे दिवस 

नागपूर : धकाधकीच्या जीवनशैलीमुळे अलीकडच्या काळात तयार दिवाळी पदार्थांची मागणी वाढली आहे. विशेषत: गृहउद्योग केंद्रांकडे फराळ तयार करून घेण्यासाठी पूर्वनोंदणी व्हायची. मात्र गेल्या दोन वर्षात करोनाच्या संकटामुळे तयार फराळाची मागणी ६० टक्क्यांनी घटली होती. मात्र आता करोनाचा प्रादुर्भाव ओसरला असून दोन वर्षानंतर मागणी पूर्वपदावर आली आहे. पण यंदा इंधन आणि गॅस सिलेंडचे दर वाढल्याने तयार फराळ १० टक्क्यांनी महागला आहे.

दिवाळीला काहीच दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे सध्या बाजारात खरेदीला उधाण आले आहे. अशात गेल्या काही वर्षांपासून दिवळीत तयार फराळाच्या मागणीत वाढ झाली आहे. गेल्या दोन वर्षात करोनामुळे नागरिकांनी बाहेरचे खाणे टाळले होते. त्यामुळे करोनाच्या दोन्ही लाटेत गृहउद्योगाला मोठा फटका बसला होता. परिणामी अनेकांवर बेरोजगारीची वेळही आली. मात्र आता करोनाचा प्रादुर्भाव ओसरला असून गृहउद्योगांकडे मोठ्या प्रमाणात दिवाळीच्या फराळाच्या मागणीसाठी नोंदणी केली जात आहे. अनेक गृहिणी दिवाळीत एक दोन पदार्थ घरी तयार करतात आणि उर्वरित गृहउद्योगाकडून विकत घेतात. मात्र सध्या गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत फराळाच्या किंमतीत दहा टक्क्यांनी दरवाढ झाली आहे. अनरसे ७०० तर बेसन, बुंदीचे लाडू ६०० रुपये किलोवर गेले आहे. किराणा साहित्य, खाद्यतेल, पेट्रोल, डिझेलसह गॅस सिलेंडरचे दर सर्वसामान्यांच्या आटोक्याबाहेर गेल्याने त्याचा परिणाम दिवाळीच्या फराळाच्या किमतीवरही झाला आहे.

नागपुरात पाच हजारांवर गृहउद्योग असून यातून हजारो महिलांना रोजगार मिळतो. पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती असल्याने महिला एकत्रित फराळ घरीच बनवायच्यात. आताही बहुतांश महिला घरीच दिवाळीच्या फराळाचे पदार्थ तयार करतात. मात्र अनेक महिला नोकरदार झाल्या असून कुटुंबदेखील विभक्त झाले असल्याने वेळेअभावी घरीच फराळ तयार करणे अनेकांना अशक्य झाले आहे. त्यामुळे बाजारात आणि गृहउद्योग चालकांकडे तयार होणाऱ्या फराळाला सध्या चांगली मागणी. यामुळे महिलांना रोजगारही मिळत आहे. गृहउद्योगात हवे ते पदार्थ पूर्ण नोंदणी करून मिळत आहे. करोनानंतर दोन वर्षानंतर प्रथमच तयार बाजारात व गृहउद्योग चालकांकडे दिवाळीच्या फराळाची मागणी वाढल्याने दिलासादायक चित्र आहे.