गळ्यातील फासासह तीन महिने वाघिणीची भ्रमंती

वनपरिक्षेत्र अधिकारी आणि इतर कर्मचारी यांच्यातही समन्वयाचा अभाव आहे.

चंद्रपूर वनक्षेत्रातील  प्रकार; मानेला गंभीर जखमा

नागपूर : नियोजनशून्यता आणि व्यवस्थापनात गांभीर्याचा अभाव यामुळे गेल्या तीन महिन्यांपासून एक वाघीण गळ्यात फास अडकलेल्या स्थितीत चंद्रपूर वनक्षेत्रात फिरत आहे. फासामुळे वाघिणीच्या मानेवर गंभीर जखम झाली असून पावसाळ्यात ही जखम आणखी चिघळली आहे. मात्र, औषधोपचार करण्यासाठी अजूनही या वाघिणीला जेरबंद करण्यात वनखाते अपयशी ठरले आहे. वनविभागाला वाघिणीच्या मृत्यूची तर प्रतीक्षा नाही ना, असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जात आहे.

चंद्रपूर वनक्षेत्रात २३ मे रोजी गळ्यात फास अडकलेल्या अवस्थेतील वाघीण वनखात्याच्या कर्मचाऱ्यांना दिसली. वरोरा-भद्रावती परिसरातच वावर असलेल्या या वाघिणीला जेरबंद करण्यासाठी सुरुवातीला खात्याने मोठा फौजफाटा गोळा के ला. त्यामुळे गोंधळलेल्या वाघिणीने माणसांपासून दूर तिचा अधिवास शोधला. सुरुवातीपासूनच वाघिणीला जेरबंद करण्याच्या मोहिमेत नियोजनाचा अभाव दिसून आला. मागील एक महिन्यापासून यात खात्याने थोडी सुधारणा के ली तरीही गांभीर्य नाही. ब्रम्हपुरी येथून जीवशास्त्रज्ञ, नेमबाज, पशुवैद्यक आणि दोन लहान बचावपथक आता या मोहिमेवर आहेत. चंद्रपूर वनक्षेत्रातील विभागीय वनाधिकाऱ्यांचा अतिरिक्त भार ब्रम्हपुरीच्या अधिकाऱ्यावर सोपवण्यात आला आहे.  सहाय्यक वनसंरक्षक पदावर नव्याने नियुक्ती झाली आहे.

वनपरिक्षेत्र अधिकारी आणि इतर कर्मचारी यांच्यातही समन्वयाचा अभाव आहे. गळ्यात फास अडकलेल्या अवस्थेत वाघीण मे महिन्यातच दिसून आली. सुमारे दीड महिन्यात वनविभागाला काहीच करता आले नाही. खात्याचे अधिकारी आता पावसामुळे व जंगल घनदाट असल्याने शोधमोहिमेत अडचणी येत असल्याचे कारण समोर करत आहेत.

कॅ मेरा ट्रॅपमध्ये छायाचित्र

या वाघिणीसोबत  तिच्यापेक्षा लहान असलेला एक वाघ आहे. ते दोघेही एकमेकांना संरक्षण देत आहेत. वरोरा आणि चिमूरचा रस्ता ओलांडल्यानंतर डाव्या बाजूला असलेल्या घनदाट जंगलात त्यांचे वास्तव्य आहे. ही वाघीण कोणत्याही क्षेत्रात गेली तरीही कक्ष नऊ आणि दहामध्येच  येऊन थांबते. दरम्यान, मंगळवारी कॅ मेरा ट्रॅपमध्ये या वाघिणीचे छायाचित्र आले.

शिकारीचा प्रयत्न?

शिकारीच्या प्रयत्नातूनच तिच्या गळ्यात फास अडकला असण्याची दाट शक्यता आहे. काही वर्षांपूर्वी ताडोबाजवळील पळसगाव क्षेत्रात दोन वाघ शिकाऱ्यांच्या जाळ्यात अडकले होते. त्यातील एकाचा मृत्यू तर एकाला कायमचे अपंगत्व आले आहे. त्यानंतर दोन वर्षापूर्वी एप्रिल २०१९ मध्ये स्टील वायरच्या जाळ्यात अडकू न वाघिणीचा मृत्यू झाला होता. त्या प्रकरणातही पळसगावच्या ग्रामस्थांना अटक करण्यात आली. आताही या वाघिणीच्या गळ्यात अडकलेल्या फासामागे याच गावाचा संबंध असण्याची दाट शक्यता व्यक्त के ली जात आहे.

‘लवकरच जेरबंद करू’

गेल्या एक महिन्यापासून वाघीण दिसली नाही. माणसे दिसली की ती दूर जाते. त्यामुळे तिला जेरबंद करण्यासाठी बेशुद्धीकरणाच्या प्रक्रि येतही अडचण येत आहे. मारलेल्या जनावराजवळदेखील ती येत नाही. आम्ही कॅ मेरा ट्रॅप लावले आहेत. पावसाळ्यामुळे अडचणी येत आहेत. पण लवकरच तिला जेरबंद करू, असे वनपरिक्षेत्र अधिकारी राठोड यांनी सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नागपूर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Types chandrapur forest severe injuries to tiger neck waiting for death akp