चंद्रपूर : महाराष्ट्रात गेल्या पाच वर्षांत ३६ हजार कंपन्या बंद पडल्याचा आकडा नेमका कुठून आला, याचा आपण शोध घेऊ. केंद्र सरकारने ही माहिती दिली असली तरी हा आकडा कोणत्या स्रोतावरून आला, याची तपासणी तसेच चौकशी करण्यासाठी मला एक दिवसाचा वेळ द्या, असे राज्याचे उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत बुधवारी येथे म्हणाले.
जिल्हाधिकारी कार्यालयात उद्योग प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. गोंडपिंपरी तालुक्यातील १३ गावांनी प्रस्तावित एमआयडीसीला शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय पुढे जाणार नाही, असे सामंत यांनी स्पष्ट केले. येत्या चार-पाच दिवसांत जिल्हाधिकारी शेतकऱ्यांची बैठक घेणार असून, आपण ऑनलाइन उपस्थित राहणार आहोत. गरज भासल्यास पुन्हा चंद्रपुरात येऊन शेतकऱ्यांशी संवाद साधू, असेही त्यांनी सांगितले.
चंद्रपूरच्या उद्योगांना १०० टक्के प्रोत्साहन
चंद्रपूर हा औद्योगिक जिल्हा असून वीज, पाणी यांसह आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत. सध्या गडचिरोलीतील उद्योगांना १०० टक्के, तर चंद्रपूरमधील उद्योगांना ८० टक्के प्रोत्साहन मिळते. आता गडचिरोली प्रमाणेच चंद्रपूर जिल्ह्यातील उद्योगांनाही १०० टक्के प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. औद्योगिक क्षेत्रातील पायाभूत सुविधांसाठी ६५ कोटी रुपये, तर भद्रावती येथील एमआयडीसी येथे क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चरसाठी ३६० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. यामध्ये राज्य शासन १८० कोटी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ ९० कोटी आणि स्थानिक खनिज विकास निधीतून ९० कोटी रुपये देणार आहे.
एमएसएमईसाठी २० टक्के जागा
औद्योगिक क्षेत्रात सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांसाठी (एमएसएमई) २० टक्के जागा राखीव ठेवण्याचे धोरण निश्चित करण्यात आले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातून काढून घेतलेले १८ भूखंड तातडीने एमएसएमईसाठी उपलब्ध करून देण्यात येतील, असे सामंत यांनी सांगितले. जिल्ह्यात उद्योग वाढले तरच बेरोजगारीचा प्रश्न सुटण्यास मदत होईल. त्यामुळे पायाभूत सुविधा वाढविण्यावर भर राहील. उद्योगांचे नुकसान होऊ दिले जाणार नाही. कृषीआधारित उद्योगांनाही प्रोत्साहन देण्यात येईल. उद्योगांच्या परिसंस्थेत स्थानिकांना रोजगार मिळावा, यासाठी प्रयत्न केले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले..मोठ्या उद्योगांना लघुउद्योगांकडून असलेल्या अपेक्षा जाणून घेण्यासाठी उद्योग प्रतिनिधींची स्वतंत्र बैठक घेण्यात येणार आहे. दावोस येथील जागतिक गुंतवणूक परिषदेत सामंजस्य करार झालेले न्यू एरा क्लीनटेक एनर्जी आणि ग्रेटा एनर्जी हे दोन उद्योग भद्रावती परिसरात आले असल्याची माहितीही त्यांनी दिली.
मराठी भाषा शिकून घ्यावी
ऑटोचालकांसाठी मराठी भाषा सक्तीची करताना लोकप्रतिनिधींनाच लिहून दिलेले मराठी वाचता येत नसल्याच्या प्रश्नावर, ज्यांना मराठी भाषा अवगत नाही त्यांनी ती शिकून घ्यावी, असे सामंत म्हणाले.
अभिजीत दीपके यांच्या आंदोलनाकडे विद्यार्थी आंदोलन म्हणून पाहत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा दिला; मात्र झारखंडमधील विद्यार्थी आंदोलनात त्यांनी सहभाग का घेतला नाही, असा सवालही सामंत यांनी उपस्थित केला.
