नागपूर : देशात १९८५ च्या ५२ व्या घटनादुरुस्तीनुसार देशात पक्षांतर बंदी कायदा आहे. या पार्श्वभूमीवर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी “आम्ही पक्षांतर करणे, आम्ही आमचा विचार बदलणे, हा आम्हाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेने दिलेला अधिकार आहे”, असे वक्तव्य केले. यातून नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

नेमक काय म्हणाले उदय सामंत

शिवसेना ठाकरे गटातील सहा खासदारांनी शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यावरून उद्धव ठाकरे गटाच्या नेत्यांनी, विशेषत: संजय राऊत यांनी या सहा खासदारांवर जोरदार टिका केली. या पार्श्वभूमीवर उदय सामंत यांना विचारले असता ते म्हणाले, “आम्ही पक्षांतर करणे, आम्ही आमचा विचार बदलणे, हा आम्हाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेने दिलेला अधिकार आहे. संविधानाच्या नियमात बसून जर आम्ही ते करत आहोत तर त्यावरून कुणी शिविगाळ कशाला करायची. चार साडेचार वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व स्वीकारणाऱ्यांना आई-बहिणी वरून शिव्या घालण्यात आल्या. खूनाची धमकी, तुडवतो म्हणून धमक्या देण्यात आल्या. वादाची सुरुवात कुठून होते, याचा विचारही करणे गरजेचे आहे”, असे ते म्हणाले.

शिंदे यांच्या नेतृत्त्वात काम करण्याची मविआच्या आमदारांची इच्छा

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वात दररोज पक्षप्रवेश होत आहे. त्यामुळे ऑपरेशन एक, दोन असा क्रमांक देताना ३६५ पर्यंत क्रमांक द्यावा लागेल, असेही सामंत म्हणाले. महाविकास आघाडीच्या आमदारांची इच्छा एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व स्वीकारण्याची असेल तर आम्ही का नाकारावं?, असा सवाल करीत संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रतिनिधीमध्ये ही इच्छा तयार झालेली आहे हे नाकारता येत नाही, असेही ते म्हणाले.

विजय वडेट्टीवार आले तर सर्वांत आनंद मला

कॉंग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार चांगले मित्र आहेत. ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेही चांगले मित्र आहेत. परंतु त्यांनी पक्षप्रवेशाबाबत आमच्याशी कधीही चर्चा केली नाही. मात्र त्यांच्यासारखे विदर्भाशी नाळ जोडलेले नेते एकनाथ शिंदे यांच्या सोबत आले तर सगळ्यात आनंदी मी असेल, असे सामंत यांनी नमुद केले. मी त्यांच्यासोबत काम केले आहे. ते येत असतील तर कुणाला नको, असेही सामंत म्हणाले.

संजय दिना पाटलांची वागण्याची पद्धतच तशी आहे

ते म्हणाले, खासदार संजय दिना पाटलांची वागण्याची पद्धतच तशी आहे. मात्र ते जे काही बोलले त्याचे पक्षाने कुठेही समर्थन केले नाही, त्यांनी माफी मागितली आहे. संजय पाटील जीवाला जीव देणारा मित्र आहे. भले आम्ही वेगवेगळ्या पार्टीत असलो तरी पूर्वीपासूनचे मित्र आहोत, असे सामंत म्हणाले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वत: यावर बोलले आहे. भविष्यात त्यांच्याकडून अशी चूक होणार नाही अशी देखील चर्चा उपमुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांच्यासोबत केल्याचे नमुद करीत सामंत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

डेटा सेंटरच्या परिणामाच्या अभ्यासासाठी समिती

राज्याचा औद्योगिक विकास वेगाने करतानाच पर्यावरण आणि स्थानिक नागरिकांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्यातील डेटा सेंटर प्रकल्पांमुळे पाणी, वीज, पर्यावरण, तापमानवाढ आणि स्थानिक जनतेच्या जीवनमानावर होणाऱ्या परिणामांचा सर्वंकष अभ्यास करण्यासाठी ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात येणार आहे. या प्रस्तावित समितीचे अध्यक्षपद स्वीकारण्यासाठी डॉ. काकोडकर यांना विनंती करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.