लोकसत्‍ता टीम

अमरावती : नरेंद्र मोदी आता देशाचे काळजीवाह‍ू पंतप्रधान आहेत. ते सध्‍या त्‍यांच्‍या पक्षाची काळजी घेत आहेत. त्‍यांना परत सत्‍तेवर येणार नाही, याची भीती भेडसावत आहे. राज्‍यात प्रचारासाठी वारंवार येत आहेत, गल्‍लीबोळात फिरत आहेत, अशी टीका माजी मुख्‍यमंत्री उद्धव ठाकरे यांनी येथे केली.

काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखडे यांच्‍या प्रचारार्थ येथील संत ज्ञानेश्‍वर सांस्‍कृतिक सभागृहात आयोजित इंडिया आघाडीच्‍या मेळाव्‍यात ते बोलत होते. यावेळी राष्‍ट्रवादी काँग्रेसचे अध्‍यक्ष शरद पवार, काँग्रेसचे सरचिटणीस मुकुल वासनिक, आमदार यशोमती ठाकूर, माजी मंत्री अनिल देशमुख, डॉ. सुनील देशमुख आदी उपस्थित होते.

आणखी वाचा-“देशात नवीन पुतिन…”, शरद पवारांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका; म्हणाले…

उद्धव ठाकरे म्‍हणाले, आज जे सत्‍तेवर बसले, त्‍यांचा स्‍वातंत्र्य लढ्याशी संबंध नव्‍हता. नरेंद्र मोदी सतत काँग्रेसवर टीका करतात. काँग्रेस सत्‍तेवर आली, तर ज्‍यांना जास्‍त मुले होतात, त्‍यांना सर्व संपत्‍ती वाटून टाकेल, असे ते काल आपल्‍या भाषणात म्‍हणाले. तुम्‍ही दहा वर्षे सत्‍तेत होतात, कमी मुले होणाऱ्यांना संपत्ती का नाही वाटली. जास्‍त मुले कुणाला होतात आणि कमी मुले कुणाला होतात, हे मोदींना कसे कळते ते देवजाणे. दहा वर्षे तुम्‍ही सत्‍तेवर होतात, आम्‍हीच मूर्ख होतो, तुम्‍हाला सत्‍तेवर पोहचून दिले. पंधरा लाख रुपये येणार होते, ते अजून आलेले नाहीत. ही निवडणूक शेतकरी आणि सर्वसामान्‍यांच्‍या जीवन-मरणाची लढाई आहे. स्‍वातंत्र्यात लढायचे की पारतंत्र्यांत हे आपल्‍याला ठरवावे लागणार आहे, असेही ठाकरे म्हणाले.

उद्धव ठाकरे यांनी भाजपचे चंद्रपूरचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्‍यावरही टीका केली. ते म्‍हणाले, आम्‍ही महिलांचा कायम आदरच केला आहे. पण, सुधीर मुनगंटीवार यांनी बहीण-भावाच्‍या नात्‍याविषयी जो उल्‍लेख केला, त्‍यात कुणाचा अपमान झाला? एक विकृत माणूस दुर्देवाने राज्‍याचा सांस्‍कृतिक मंत्री आहे. एवढा असंस्‍कृत माणूस आपण पाहिला नाही. आम्‍ही महिलेविषयी काही बोलतो, तेव्‍हा त्‍यांना अपमान वाटतो. मुनगंटीवार यांच्‍या वक्‍तव्‍याबद्दल भाजपने संपूर्ण देशाची माफी मागितली पाहिजे. राज्‍याचा एक मंत्री सुप्रिया सुळे यांच्‍याविषयी अपमानजनक बोलतो, तेव्‍हा तुम्‍ही मूग गिळून बसता. मणीपूरमध्‍ये काय झाले, पंतप्रधान एकवेळाही तिथे गेले नाहीत. भाजपकडून आम्‍हाला हिंदुत्‍वाची शिकवणी लावण्‍याची गरज नाही, तुमच्‍या रक्‍तामध्‍ये देशप्रेम आहे की नाही, हेच आम्‍हाला शोधावे लागेल, असे उद्धव ठाकरे म्‍हणाले.

आणखी वाचा-‘अवकाळी’चे पुनरागमन, राज्यातील ‘या’ भागात आज पुन्हा बरसणार…

शेतकऱ्यांची तरूण मुले इकडे आत्‍महत्‍या करीत आहेत. बेरोजगारी प्रचंड वाढली आहे. त्‍यांच्‍यासाठी तुम्‍ही कधी दोन शब्‍द कधी खर्ची घातले आहेत का? आधी तुम्‍ही दहा वर्षे काय केले याचा हिशेब द्या, नंतर तीस वर्षांत काय करणार, याच्‍या गप्‍पा करा. शेतकरी उपाशी आहेत. त्‍यांच्‍याच खिशातील पैसे लुटून त्‍यांना सहा हजार रुपयांची भीक देत आहेत, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.